कन्नड तालुक्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:32+5:302021-05-22T04:05:32+5:30
तालुक्याचे खरीप हंगामाचे सरासरी लागवड क्षेत्र अंदाजित ९९ हजार ८३१ हेक्टर आहे. तालुक्यात कापूस, मका, तूर, सोयाबीन, आद्रक, भाजीपाला ...
तालुक्याचे खरीप हंगामाचे सरासरी लागवड क्षेत्र अंदाजित ९९ हजार ८३१ हेक्टर आहे. तालुक्यात कापूस, मका, तूर, सोयाबीन, आद्रक, भाजीपाला इ. महत्त्वाची पिके घेतली जातात. कापसाचे साधारण ४६ हजार ९३३ हे. क्षेत्र, मका पिकाचे ३३ हजार ७८१ हे. क्षेत्र, तूर पिकाचे २ हजार ७३९ हे., सोयाबीन ८०५ हे., आद्रक ६ हजार ३३० हे. व भाजीपाला २ हजार हे. क्षेत्र आहे. यावर्षी कापसाचे अंदाजित मागील वर्षाएवढे लागवड क्षेत्र राहिल. मागील दोन, तीन महिन्यात सोयाबीनचे वाढते बाजार दर पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पेरणीकडे वाढता आहे. तसेच इतर कडधान्ये तूर, उडीद, मूग या पिकांचे पेरणी क्षेत्र देखील वाढणार आहे. मकाचे चालू वर्षी बाजारभाव कमी असल्यामुळे तसेच फवारणी खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा मका लागवडीकडील कल कमी दिसून येत आहे. चिंचोली मंडळ तसेच कन्नड मंडळामध्ये मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. तसेच भाजीपाला क्षेत्र वाढलेले आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील पूर्व हंगामी तसेच सुरू उसाचे लागवड क्षेत्र वाढलेले आहे.
खरीप हंगामाच्या दृष्टीने आवश्यक बियाणे, खते व कीटकनाशके यांचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे.
उत्पादकता वाढ अभियान
कृषि विभागामार्फत खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया मोहीम, माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा संतुलित वापर, बी.बी.एफ (रुंद सरी व वरंबा) तंत्रज्ञानाद्वारे पिकांची पेरणी आदी मोहिमांना सुरुवात केली आहे.
चौकट
तालुक्यासाठी रासायनिक खतांचे मंजूर आवंटन
युरिया- १३ हजार ६५१ मे. टन, डीएपी- २ हजार ८९१ मे. टन, एसएसपी- ४ हजार २४३ मे. टन, एमओपी- २ हजार ७९५ मे. टन एकूण संयुक्त खते- १२ हजार २९४ मे. टन असे मिळून एकूण ३५ हजार ८७५ मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा होणार नाही, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी बाळराजे मुळीक यांनी दिली.