लोकमत महामॅरेथॉनसाठी चीन आणि तैवान येथील धावपटूंचीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:20 AM2017-12-01T01:20:16+5:302017-12-01T01:20:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉन स्पर्धा जसजशी जवळ येत आहे तसतसा धावपटंूमध्ये नवा उत्साह संचारत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉन स्पर्धा जसजशी जवळ येत आहे तसतसा धावपटंूमध्ये नवा उत्साह संचारत आहे. तीन आठवड्यांवर आलेल्या या स्पर्धेची ‘क्रेझ’ एवढी आहे की, केवळ स्थानिक धावपटूंनाच नाही, तर परदेशी पाहुण्यांनादेखील महामॅरेथॉनचे वेध लागले आहेत. सध्या शहरात वास्तव्यास असलेल्या दोन चिनी व एक तैवानी धावपटूंनी नुकताच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली.
चीनचे जिआंजून वेई (५०) व वँग्यान पेंग (४५) आणि तैवानचे चाओचीन हुआंग (३२) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे विदेशी पाहुणे शहरातील एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे हे तिघे काही सराईत धावपटू नाहीत; परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉनची उत्साहपूर्ण चर्चा ऐकून त्यांना यामध्ये सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. हजारोंच्या संख्येने लोक एकत्र धावणार म्हटल्यावर जोश आणि जल्लोष काही निराळाच असणार यात काही शंका
नाही.
‘लोकमत’शी बोलताना चाओचीन हुआंग म्हणाले की, ‘लोकमत महामॅरेथॉनसारख्या भव्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला विश्वास आहे की, आम्हा सगळ्यांना खूप मजा येणार आहे.’ जिआंजुन आणि वँग्यान यांनीही हुआंगप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त
केली.
ते म्हणाले, ‘आता आम्हाला १७ डिसेंबरची प्रतीक्षा आहे. त्या दिवशी आम्ही अत्यंत मनमोकळेपणाने स्पर्धेचा आनंद लुटणार
आहोत.
यानिमित्त नवे मित्रही जोडले जातील. वेगाने किंवा हळू धावू; पण आम्ही स्पर्धा पूर्ण करणार. आयुष्यभर स्मरणात राहील, असा हा दिवस ठरेल, अशी आशा आहे.’