लागा तयारीला, छत्रपती संभाजीनगर मनपात दोन महिन्यांत नोकर भरती
By मुजीब देवणीकर | Published: March 31, 2023 07:26 PM2023-03-31T19:26:53+5:302023-03-31T19:27:08+5:30
आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ आहे. त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून नोकर भरती रखडली आहे. जेव्हा जेव्हा भरतीसाठी पुढाकार घेण्यात आला, त्यात विघ्न येत गेले. आता प्रशासनाने अत्यावश्यक ११० पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जाहिरात तयार करण्याचे काम सुरू असून, नोकर भरतीसाठी आयबीपीएस या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांत नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी सांगितले.
महापालिकेत मागील १५ ते २० वर्षात निवृत्तीचे प्रमाण वाढत गेले. त्या तुलनेत रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. शासनाने मागील वर्षी नवीन आकृतिबंध मंजूर केल्याने पदांची संख्या वाढली. आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ आहे. त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर गरजेनुसार भरती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली. त्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादेला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने वर्ग १ ते ३ मधील निवडक पदेच भरण्याचा निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली आहे.
एजन्सीची नियुक्ती
सध्या बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू आहे. शासनाने नोकर भरतीसंदर्भात नियुक्त केलेल्या एजन्सीपैकी आयबीपीएस या संस्थेची निवड केली आहे. त्यांनीही कामासाठी सहमती दर्शविली आहे. जाहिरातीचा नमुना तयार करून पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले असून, जाहिरात तयार केली जात आहे. नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन महिने हे काम चालेल.
- रणजीत पाटील, अतिरिक्त आयुक्त, मनपा.
एजन्सीला पैसे द्यावे लागतील
शासनाने नोकर भरतीसंदर्भात एजन्सी अंतिम करताना प्रत्येक पदासाठी विशिष्ट शुल्क ठरवून दिले आहेत. त्यानुसार संबंधित एजन्सीला पैसे दिले जातील. ११५ पदे भरण्याचा निर्णय झाला होता, पण यातील पाच लिपिक पदे अनुकंपा तत्त्वावर भरल्याचे पाटील म्हणाले.
अशी आहेत पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -२६
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-०७
कनिष्ठ अभियंता (विद्युत)-१०
कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर)-०१
लेखा परीक्षक-०१
लेखापाल-०२
विद्युत पर्यवेक्षक-०३
अभियांत्रिकी सहायक-१३
स्वच्छता निरीक्षक-०७
पशुधन पर्यवेक्षक-०२
प्रमुख अग्निशमन अधिकारी-०९
अग्निशमन अधिकारी-२०
कनिष्ठ लेखापाल-०२
लेखा विभाग लिपिक-०५
-------------