बिबिका मकबरा परिसर विकासासाठी प्रकल्प अहवाल तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:04 AM2021-05-19T04:04:21+5:302021-05-19T04:04:21+5:30
औरंगाबाद : देशी आणि विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बिबिका मकबराच्या सुशोभिकरणासाठी परिसरातील अतिक्रमणे, डीपी रस्ता, प्रकाश व्यवस्था ...
औरंगाबाद : देशी आणि विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बिबिका मकबराच्या सुशोभिकरणासाठी परिसरातील अतिक्रमणे, डीपी रस्ता, प्रकाश व्यवस्था करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करावा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुरातत्व विभागासह मनपा अधिकाऱ्यांना दिले.
बिबिका मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. विदेशासह बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना मात्र अरुंद रस्ता, परिसरातील अतिक्रमण आणि रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. भारतीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभागाने बिबिका मकबरा परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीस पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता संजय काकडे, उपअभियंता फड, सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर आदींची उपस्थिती होती. मकबरा परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी पर्यटक विभागाने निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. हा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.