आयआयटी, एम्सचे रुग्णालयासाठी प्रस्ताव तयार करा; केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 12:46 PM2021-09-07T12:46:59+5:302021-09-07T12:47:37+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात साेमवारी मराठवाड्यातील विकास कामे, केंद्र शासनाकडील प्रलंबित विषय, केंद्राकडे पाठविण्याचे येणाऱ्या नवीन प्रस्तावांवर बैठक झाली.
औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, दुहेरीकरण आणि नवीन प्रस्तावित मार्ग, औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचा विकास आराखडा तयार करण्यासह मनमाड-परभणी दुहेरी रेल्वेमार्ग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. यासह औरंगाबाद-चाळीसगाव, जालना-खामगाव, रोटेगाव-कोपरगाव या नवीन रेल्वे मार्गांसाठी पाठपुरावा करण्यात येईल. औरंगाबाद विभागात एम्सचे रुग्णालय ( AIMS ) सुरू करण्यासह आयआयटी पवईची (IIT Pawai ) शाखा औरंगाबाद विभागात स्थापन करण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat karad ) यांनी विभागीय आयुक्तालयातील एका बैठकीत केली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात साेमवारी मराठवाड्यातील विकास कामे, केंद्र शासनाकडील प्रलंबित विषय, केंद्राकडे पाठविण्याचे येणाऱ्या नवीन प्रस्तावांवर बैठक झाली. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांच्या नवीन शाखा सुरू करणे, राष्ट्रीय पर्यटन विद्यापीठ सुरू करणे, औरंगाबाद विमानतळाचे विस्तारीकरण पाठपुरावा करणे, विभागातील प्राचीन स्मारके संवर्धन करणे, अजिंठा, दौलताबाद येथे रोप-वे तयार करण्यासाठी सर्वेक्षण करणे. तसेच घृष्णेश्वर, अहिल्यादेवी कुंड, दौलताबाद, या ठिकाणी साऊंड व लाइटची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बँकांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, उपायुक्त जगदीश मिनियार, शिवाजी शिंदे, वनसंरक्षक सत्यजित गुजर, डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. एकनाथ माले, रेल्वेचे अधिकारी सुरेश सोनवणे, अभियंता सुरेश अभंग, महावितरणचे भुजंग खंदारे, अभियंता एस.एस. भगत उपस्थित होते.
या प्रस्तावांचा घेतला आढावा-
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर प्रस्तावाची सद्य:स्थिती, बाबा पेट्रोल पंप ते विमानतळदरम्यान उड्डाणपुलाचे बांधकाम, नगर नाका ते दौलताबाद टी पाॅइंट रस्त्याचे चौपदरीकरण, दौलताबाद बायपासची सद्य:स्थिती, परभणी शहर वळण रस्ता, राहटी जि. परभणी येथे पूर्णा नदीवर ब्रीज कम बॅरेज बनविणे, ऑट्रम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथे रिजनल जिरियाट्रिक्स सेंटर स्थापित करणे आदी विषयांचा डॉ. कराड यांनी आढावा घेतला.