वधूपित्यांची बजेट वाढविण्याची तयारी; शाही लग्नात देशी पदार्थांसोबत पिझ्झा, पास्ताचे फ्यूजन
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 3, 2024 02:13 PM2024-12-03T14:13:26+5:302024-12-03T14:14:22+5:30
शाही लग्नात देशी-विदेशी व्यंजनांचा आस्वाद; शेवटी लग्न सोहळ्याची संपूर्ण मदार ‘जेवणा’वरच असते.
छत्रपती संभाजीनगर : शाही लग्नामध्ये देशी पदार्थांसोबत युरोपियन, मेक्सिकन, जपानी, चिनी पदार्थांचे खास काउंटर असतेच; पण आता भारतीय पदार्थ व चीनमधील खास पदार्थांना एकत्र करून फ्यूजन टेस्ट बनविली जात आहे. तसेच मराठमोळी लग्नातील सुरुची भोजनात पिझ्झा व पास्ताचाही शिरकाव झाला आहे. हेच यंदाच्या लग्नसराईचे वैशिष्ट्य ठरत आहे. खवय्येही या नवीन चवीचा मनसोक्त आनंद घेत आहेत.
लग्न किती थाटामाटात करा, डोळे दिपविणारी भव्य-दिव्य सजावट, संगीत पार्टी, महागडे रिटर्न गिफ्ट सर्व काही करा त्याचे कौतुक होणारच, पण जेवणाची भट्टी जमली नाही तर सर्वांचा हिरमोड होऊ शकतो. शेवटी लग्न सोहळ्याची संपूर्ण मदार ‘जेवणा’वरच असते.
शाही लग्नात देशी-विदेशी व्यंजनांचा आस्वाद
शहरात शाही लग्न सोहळे पार पडत आहेत. यात देशी-विदेशी पदार्थांचे २७ पेक्षा अधिक प्रकार व ३९ पेक्षा अधिक काउंटर खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. यात युरोपियन, मेक्सिकन, जपानी, चिनी देशातील प्रसिद्ध पदार्थांचे स्टॉल आहेत. थंडीचे दिवस लक्षात घेऊन स्ट्रीम फूड व लाइव काउंटर फूड स्टॉलला मागणी वाढली आहे. तव्यावरील गरम गरम पदार्थ खाण्यात मजा येते. आता यात केटरर्सनी आणखी नावीन्य आणले आहे. दोन देशांतील प्रसिद्ध पदार्थ एकत्र करून नवीन डिश तयार केली जात आहे. दक्षिण भारतातील पदार्थ व त्यात चायनीज पदार्थ मिक्स करणे, किंवा इटालियन व चायनीज पदार्थ मिक्स केल्याने फ्यूजन टेस्टचा आनंद पाहुण्यांना मिळत आहे.
दर्जेदार, उत्कृष्ट चवदार पदार्थावर खर्च
शाही भोजनात गुणवत्तेवर जास्त भर दिला जातो. जास्त पैसा खर्च केला जातो, पण पदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड केली जात नाही. दर्जेदार, शुद्ध, उत्कृष्ट चवदार पदार्थांसोबत आता काउंटरच्या ठिकाणची स्वच्छता, विनम्र वेटर्स व वऱ्हाडींसमोर ‘डिश’ सादर करण्याची पद्धत या बाबीवर भर दिला जात आहे, असे केटरर्स व्यावसायिकांनी नमूद केले.
बजेट वाढविण्याची तयारी
मराठमोळ्या लग्नातील सुरुची भोजनात सात्त्विक पदार्थ असतात. त्यात थंडीच्या दिवसात गुलाबजाम, गाजराचा हलवा, मुगाचा शिरा, जिलेबी असते. उन्हाळ्यातील लग्नात आइस्क्रीम व कुल्फीनेस्थान मिळविले. आता मुले व तरुणाईमध्ये प्रिय असलेले पिझ्झा व पास्ताने शिरकाव केला आहे. यासाठी बजेट वाढविण्याची तयारीही वधूपित्यांनी ठेवली आहे. अशी माहिती केटरर्स व्यावसायिकांनी दिली.