जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 06:25 PM2023-06-01T18:25:26+5:302023-06-01T18:26:41+5:30

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला

Presently 37.22% of water in Jayakwadi Dam; 54 TMC water consumption per year | जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

googlenewsNext

- संजय जाधव

पैठण: जायकवाडी धरणातून सिंचनासाठी यंदा ३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग डाव्या व उजव्या कालव्यातून करण्यात आला असून नियमित सर्व आवर्तने सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. १ जून २०२३ रोजी जायकवाडी धरणात ३७.२२% जलसाठा शिल्लक असून गतवर्षी आजच्या तारखेला धरणात ३८.३५% जलसाठा होता. यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तब्बल ९.७४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे. एकंदरीत १ जून २०२२ ते १ जून २०२३ या जलवर्षात जलसाठ्यातून ५४.३६ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणातून तब्बल ११३ दिवस विसर्ग सुरू होता. या कालावधीत २०९ टीएमसी   धरण दोन वेळेस भरेल ईतक्या पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला होता. जायकवाडी प्रशासनाने योग्य नियोजन करून पुरपरिस्थिती टाळून शेवटच्या टप्प्यात धरण १००% भरून ठेवले होते. यामुळे धरणावर अवलंबून असलेला औद्योगिक क्षेत्रासहीत पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेती सिंचन, उपसा योजनांना नियमितपणे पाणी पुरवठा केल्यानंतरही १ जून रोजी धरणात १५४६.०२२ दलघमी ( ५४.१९ टीएमसी) जलसाठा शिल्लक राहिला आहे.  

१० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन....
कमी खोलीचा व  उथळ असा विस्तीर्ण पानपसारा लाभल्याने नाथसागराच्या जलाशयात खोलवर सुर्य किरणे पोहचतात ; यामुळे   बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्पाकडे पाहिले जाते. यंदा  तापमानात वाढ झाल्याने १ जून पर्यंत २७६.९०५ दलघमी (९.७४ टीएमसी ) पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. आजच्या तारखेपर्यंत झालेले हे सर्वाधिक बाष्पीभवन आहे. निळवंडे प्रकल्पाची क्षमता ११ टीएमसी ऐवढी आहे यावरून बाष्पीभवनाने धरणातून किती पाण्याचा अपव्यय होतो याची तीव्रता समोर येते.

पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्राला लागते केवळ चार टीएमसी....
१०२ टीएमसी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातील जलसाठ्याची औद्योगिक क्षेत्र व पिण्याचा पाणीपुरवठा होणाऱ्या जनतेला मोठी काळजी असते. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही क्षेत्राला केवळ ४ टीएमसी पाणी लागते. यंदा १ जून अखेर दोन्ही क्षेत्रास मिळून ९७.४४ दलघमी ( ३.४४ टीएमसी) पाण्याचा पुरवठा धरणातून करण्यात आला तर विविध उपसा जलसिंचन योजनांनी ७.७९ टीएमसी जलसाठा ओढल्याचे  धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

पुर नियंत्रण कक्ष सुरु 
१ जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होते. यामुळे गुरूवारी धरणावर पुर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून जबादाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पूर्ण हंगाम होईपर्यंत २४ तास दक्ष राहून नियंत्रण कक्षात पाणलोट क्षेत्रातील व धरणाच्या नोंदी घेण्यात येतात. कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता विजय काकडे यांनी नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरूवारी सूचना व मार्गदर्शन केले.

Web Title: Presently 37.22% of water in Jayakwadi Dam; 54 TMC water consumption per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.