नव्या इमारतीसोबत जुन्या वारशाचेही जतन; देशातील पहिले जिल्हा परिषद संग्रहालय औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 03:30 PM2021-01-02T15:30:30+5:302021-01-02T15:44:09+5:30
The first Zilla Parishad Museum in the country at Aurangabad : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी आराखडा अंतिम टप्प्यात आला असून, नव्या इमारतीची उभारणी करताना जुन्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे ऐतिहासिक महत्त्वही जपण्यात येणार आहे.
- योगेश पायघन
औरंगाबाद : देशातील पहिले जिल्हा परिषद संग्रहालय औरंगाबादमध्ये उभे राहाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, जिल्हा परिषदेच्या संदर्भातील सर्व योजना व पंचायतराज संस्थेचा इतिहास याबाबत या संग्रहालयातून माहिती मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी आराखडा अंतिम टप्प्यात आला असून, नव्या इमारतीची उभारणी करताना जुन्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे ऐतिहासिक महत्त्वही जपण्यात येणार आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निजामकाळात बांधलेली जिल्हा परिषदेची इमारत अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. १९५८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना याच इमारतीत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत कोनशिलेचे अनावरण करून झाली होती. सध्या ही इमारत जीर्ण झाली आहे.
या इमारतीचे जतन, संवर्धन करण्यासोबत या इमारत जिल्हा परिषद संदर्भातील सर्व योजनांचे संग्रहालय उभे करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याबाबत पाहणी व बैठक नुकतीच पार पडली. डाॅ. मंगेश गोंदावले यांनी ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे जाणकार आर्किटेक्ट अब्राहम पॅथ्रोस यांच्या चमूसोबत निरीक्षण करत इमारतीच्या संवर्धन आणि जतनासाठीची योजना स्पष्ट केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता काझी जफर अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.
संवर्धनासोबत उपयोगही
जिल्हा परिषदेच्या संदर्भातील योजनांची माहिती सहज लोकांना कळेल, असे संग्रहालय आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाबद्दल विद्यार्थ्यांना सहज कल्पना येईल, अशा संग्रहालयाची संकल्पना आहे. जिल्हा परिषदेसंदर्भातील पुस्तकांचे ग्रंथालयही येथे असेल. त्यासोबत विविध प्रशिक्षणही तिथे देता येईल.
- काझी जफर अहमद, प्रभारी कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद
पंचयातराज संस्था, योजना लोकांना कळाव्यात
पंचयातराज संस्था लोकांना कळावी, ऐतिहासिक इमारतीचे संवर्धनासोबतच पंचयातराज संस्थेचा इतिहास लोकांना कळवा, ग्रामपंचायती, पंचायत समितीचे काम कसे चालते, योजना लोकांना कळाव्यात असे जिल्हा परिषदेचे संग्राहालय बांधण्याची संकल्पना आहे. देशात असे संग्रहालय नाही. संग्रहायलासोबत फिरते संग्रहालय करून विद्यार्थ्यांनाही त्याबद्दल जागरूक करता येईल. यासंदर्भातील खर्च आणि योजनेचा आराखडा तयार करत असून, तो मार्गी लावू.
- डाॅ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी