राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 07:06 PM2024-09-28T19:06:15+5:302024-09-28T19:07:47+5:30
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील उद्योजक, राजकारण्यांनी बागडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला.
छत्रपती संभाजीनगर : राजस्थानचे व महाराष्ट्राचे वेगळे नाते आहे. वसंतदादा पाटील, शिवराज पाटील चाकूरकर, प्रतिभा पाटील यांनी राजस्थानच्या राज्यपालपदावर काम केले. त्यातील प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला. त्यामुळे भविष्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनाही तशी संधी असल्याचे गौरवोद्गार आणि सूचक विधान अनेक मान्यवरांनी शुक्रवारी येथे काढले.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील उद्योजक, राजकारण्यांनी बागडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. देशाच्या राष्ट्रपतीपदाचा मार्ग राजस्थानातून जातो, अशी शुभेच्छारूपी प्रशंसा या सत्कार कार्यक्रमात करण्यात आली. गडकरी यांनी मात्र आपण बागडेंना राष्ट्रपतीपद मिळावे, असे म्हणणार नाही. ज्यांना जे मिळायचे आहे ते मिळतेच, असे सांगितले.
राजस्थान, महाराष्ट्राचे वेगळे नाते...
आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल ही कारकीर्द प्रेरणादायी आहे. राजस्थानचे महाराष्ट्राचे वेगळे नाते आहे. वसंतदादा पाटील, शिवराज पाटील चाकूरकर, प्रतिभा पाटील यांनी राजस्थान राज्यपालपदावर काम केले. राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण करून प्रतिभाताई जेव्हा यवतमाळला आल्या. पुढे त्यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी मिळाली. त्यामुळे आपणांस संधी आहे.
- राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ लोकमत
प्रेरणादायी प्रवास
१९८५ साली बागडे एकटेच विजयी झाले होते. कार्यकर्ता ते राज्यपाल हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. समाजकारणाचा वसा घेत त्यांनी या प्रवासात अनेक पदे भूषविली.
- विवेक देशपांडे, उद्योजक
निष्कपट, निष्कलंक नेतृत्व...
राज्यपाल बागडे हे निष्कपट, निष्कलंक नेतृत्व आहेत. जलसंधारणाची अनेक कामे सीएसआरमधून करताना त्यांनी कुठलाही पक्षाभिनिवेश बाळगला नाही.
- राम भोगले, उद्योजक
राष्ट्रपतीपदासाठी शुभेच्छा
कुशल संघटन कौशल्य असलेले नेतृत्व राज्यपाल बागडे (नाना) आहेत. सर्व क्षेत्रात नानांची भरारी आहे. बँकेचे कामकाज पाहताना त्यांनी जावयाला देखील नोटीस दिली होती, अशा नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्वास भविष्यात राष्ट्रपतीपदावर पाहायला आवडेल.
- अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री
स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व
राज्यपाल बागडे हे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व आहे. सांघिककृती, दूरदृष्टी, सहकारातून त्यांनी सामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणले. एक स्वयंसेवक राज्यपालपदापर्यंत पोहोचला याचा आनंद आहे.
- डॉ. भागवत कराड, खासदार
लक्ष फुलंब्रीकडेच
याच कार्यक्रमात बागडे जरी राजस्थानमध्ये असले तरी त्यांचे लक्ष फुलंब्री व जिल्ह्याकडेच असल्याचेही मान्यवरांनी नमूद करताच एकच हशा पिकला. मंचावर फुलंब्रीतून विधानसभेची उमेदवारी हवी असलेल्या इच्छुकांची रांग पाहिल्यानंतर अनेकांनी भाषणातून त्याकडे लक्ष वेधले. राज्यपाल बागडे यांचा कुणाला आशीर्वाद मिळणार, यावरही मान्यवरांनी भाष्य केले.
चव्हाण यांनी केले ताम्रपत्राचे वाचन..
पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी राज्यपाल बागडे यांच्यासाठी तयार केलेल्या ताम्रपत्राचे वाचन केले. तसेच अनुराधा चव्हाण यांच्या संकल्पनेतून बागडे यांच्यावर तयार केलेला जीवनपट यावेळी दाखविण्यात आला. यावेळी पद्मश्री रमेश पतंगे यांच्या बागडे यांच्या जीवनावरील ‘माझा प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री गडकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
५० वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले : राज्यपाल बागडे
सत्काराला उत्तर देताना राज्यपाल बागडे यांनी ५० वर्षांत केलेला संघर्ष व चढ-उतारांचा प्रवास उलगडला. बँकेची जडणघडण, साखर कारखान्याची उभारणी, दूधसंघाचे काम, राजकीय प्रवास, समाजकारण, संघासाठी झोकून केलेले काम, यावर राज्यपाल बागडे यांनी प्रकाश टाकला. मला ८० वे वर्ष लागणार माहिती होते. त्यामुळे मी दीड वर्षापूर्वीच निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले होते. संघटना जे काम देईल ते काम करणार होताे. परंतु, ध्यानीमनी नसताना अचानक एक दिवस मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. त्यांनी राज्याबाहेर पाठवायचे आहे, असे सांगितले. रात्री दोन वाजता राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्याचे मला कार्यकर्त्यांनी सांगितले. वयाच्या १५ व्या वर्षांपासून समाजकारणाला सुरूवात केली. सुरुवातीला मी पेपर वाटले. १९६३ साली दहावी झाली. दुधाच्या व्यवसायात आलो, तो व्यवसाय बंद केला. हे दत्ताजी भाले यांना कळाल्यानंतर त्यांनी साप्ताहिकात काम करण्यास सांगितले. १९६९ साली संघाच्या तृतीय वर्गात प्रवेश केला. फुलंब्रीतील कामाची जबाबदारी दिली. रामभाऊ गावंडे यांच्यासाठी मतदारसंघ बांधला. ज्या-ज्यावेळी संघाने जे काही सांगितले, ते केले. फुलंब्रीचे नेतृत्व करताना केलेल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकला.