रुग्णांना सुटी घेण्यासाठी खासगी रुग्णालयांचा दबाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:05 AM2021-04-20T04:05:26+5:302021-04-20T04:05:26+5:30
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला ...
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्ण, नातेवाइकांची डोकेदुखी वाढली असून रुग्णांना उपचारासाठी कुठे दाखल करावे, असा प्रश्न पडला आहे.
वाळूज उद्योगनगरीत जवळपास ८ ते १० खासगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. अनेक रुग्ण या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सद्या ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडून ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याचे भासवून ऑक्सिजन पुरविण्यास नकार दिला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना बळजबरीने डिस्चार्ज करण्यासाठी दबाव वाढविण्यास सुरवात केली आहे. दुसऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयातही बेड शिल्लक नसल्याचे कारण दिले जात असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक़ हवालदिल झाले आहेत. उपचारासाठी आगाऊ रक्कम भरूनही रुग्णालयाकडून बळजबरीने डिस्चार्ज केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. या विषयी काही खासगी डॉक्टरांशी संपर्क केला असता एजन्सीकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव डिस्चार्ज दिला जात असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
शासकीय रुग्णालयात करणार उपचार
दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम बामणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोविड रुग्णांच्या उपचारासाठी घाटी रुग्णालय व चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुगणालय व ईएसआयसी रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध केली आहे. रुग्ण व नातेवाइकांनी घाबरुन न जाता बजाजनगरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात संपर्क केल्यास त्यांना पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
फोटो ओळ- बजाजनगरातील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याचे कारण दर्शविल्याने कोविड रुग्णास नातेवाइकांची रुग्णवाहिकेतून उपचारासाठी इतरत्र हलविले.
फोटो क्रमांक- रुग्णवाहिका १/२
------------------