नेव्ही ऑफिसर असल्याची बतावणी करून विवाह करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 01:15 PM2019-01-03T13:15:06+5:302019-01-03T13:19:38+5:30
सिंगापूर येथे कार्यरत असल्याची विवाहविषयक वेबसाईटवर बतावणी करून उच्च शिक्षित तरुणीसोबत केला विवाह
औरंगाबाद : मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर असून, सध्या सिंगापूर येथे कार्यरत असल्याची विवाहविषयक वेबसाईटवर बतावणी करून उच्च शिक्षित तरुणीसोबत विवाह केल्यानंतर हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या तरुणाला ठाणे पोलिसांनीऔरंगाबादेतूनअटक केली. फसवणूक झालेली तरुणी वकील असून, तिचे वडील निवृत्त न्यायाधीश आहेत.
स्वप्नील रवींद्र तेलगोटे (३१, रा. रामकृपा कॉलनी, प्रतापनगर), असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. फसवणूक झालेल्या ठाण्यातील तरुणीने ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने विवाहविषयक संकेतस्थळावरील स्वप्नीलचा बायोडाटा त्यांनी वाचला होता. त्यामध्ये स्वप्निलने एका कंपनीत सेकंड मेट मर्चंट नेव्ही ऑफिसर असल्याचे नमूद केले होते. त्याचा बायोडाटा वाचून पीडितेने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने त्याला आता सिंगापूर येथे मरीन पोर्ट पायलट म्हणून जॉब लागल्याचे सांगितले. स्वप्निलचे स्थळ पीडितेसह तिच्या नातेवाईकांना आवडल्याने त्यांचा २८ जानेवारी २०१८ रोजी साखरपुडा झाला आणि २९ एप्रिल रोजी ठाणे येथे विवाह झाला. लग्न ठरविताना २० लाख रुपये हुंडा मागितला होता; मात्र त्यानुसार दहा लाख रुपये लग्नापूर्वी द्या आणि उर्वरित दहा लाख रुपये नंतर द्या, असे स्वप्नीलच्या आई-वडिलांनी सांगितले. त्यानुसार दहा लाख रुपये रोख स्वरूपात हुंडा म्हणून आरोपीला दिला.
लग्नामध्ये ४० तोळ्याचे दागिने पीडितेच्या अंगावर घालण्यात आले. लग्नानंतर पीडिता औरंगाबादेतील रामकृपा कॉलनीत राहण्यासाठी आली तेव्हा तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली जाई. लग्नाला दोन महिने उलटल्यानंतरही आरोपी स्वप्नील घरीच असल्याने तिने त्याच्याकडे तुम्ही सिंगापूरला कधी जाणार आहात, अशी विचारणा केली असता स्वप्नीलने तिला मारहाण केली. तेव्हा तिने तुम्ही खरेच मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहात का, असे पुन्हा विचारल्यानंतर त्याने त्यास सिंगापूरहून आलेला एक ई-मेल पीडितेच्या मोबाईलवर पाठविला. तो ई-मेल वाचल्यानंतर पीडितेला कळले की, तो स्वप्नीलनेच स्वत: तयार करून पीडितेला पाठविला आहे. स्वप्नील आणि त्याचे आई-वडील आणि भावाने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. तिने याप्रकरणी राबोडी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि ठाणे पोलिसांच्या एका पथकाने औरंगाबादेतून स्वप्नीलला अटक केली.
सासू-सासरे आणि दीरही आरोपी
पीडितेच्या तक्रारीनुसार यात तिचा पती स्वप्नील, सासरा रवींद्र तेलगोटे, सासू आणि दीर यांनाही पोलिसांनी आरोपी केले. पोलिसांनी आरोपी स्वप्नीलला अटक केली असून, तो पोलीस कोठडीत आहे. महिला उपनिरीक्षक घाडगे तपास करीत आहेत.