पत्नीला दाखविण्यासाठी टॅक्सी चालवण्याचे नाटक; प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे चोरायचा मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 04:37 PM2024-09-25T16:37:44+5:302024-09-25T16:38:29+5:30
विद्यार्थ्यांच्या घरातून मोबाइल चोरणारा अटकेत; ११ मोबाइलसह १ दुचाकी जप्त
छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण, भाडेतत्त्वावर एकत्र राहणाऱ्या तरुणांचे घर, खोल्यांमध्ये घुसून मोबाइल चोरणारा कुख्यात गुन्हेगार शेख माजिद शेख गफ्फर (३६) याला सिडको पोलिसांनी अटक केली. त्याने विकलेले ११ माेबाइल आणि १ दुचाकीही जप्त केली.
सिडको, उस्मानपुरा, क्रांतीचौक, समर्थनगर भागात सातत्याने सकाळी मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. व्यायाम, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे, पोलिस भरती, स्टडी रूम व कंपनीला जाणारे बहुतांश तरुण मित्रांसोबत भाडेतत्त्वावर खोली करून राहतात. एखादा साथीदार सकाळीच बाहेर पडल्यानंतर दरवाजा उघडा राहतो. माजिदने हीच बाब हेरत सकाळी अशा खोल्यांमधून मोबाइल चोरी सुरू केली. शनिवारी पिसादेवी रोडवर दोन मोबाइल चोरल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. उपनिरीक्षक प्रमोद देवकाते यांनी त्याची कसून चौकशी केली. त्याने बीडला विकलेले ११ मोबाइल व फिरण्यासाठी चोरलेली दुचाकी जप्त केली. अंमलदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, सहदेव साबळे, विशाल सोनवणे यांनी ही कारवाई केली.
माजिद चोरलेले बहुतांश मोबाइल बीडला नेऊन विकतो. यापूर्वी त्याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली होती. पूर्वी तो बीडवरून शहरात चोरी करण्यासाठी येत होता. चार महिन्यांपूर्वीच तो शहरात स्थायिक झाला. चोरीचे मोबाइल विकत घेतलेल्या शॉपी चालकाला मात्र पोलिसांनी अटक केली नाही.
सकाळी चोऱ्या; दिवसा टॅक्सी चालवायचा
माजिदच्या सततच्या गुन्ह्यांमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. गुन्हेगारी सोडून त्याने पत्नीला टॅक्सी चालवून कमाईचे आश्वासन दिल्यानंतर पत्नी त्याच्यासोबत हिनानगरमध्ये स्थायिक झाली. सकाळी छत्रपती संभाजीनगर जालना मार्गावर टॅक्सी चालवण्याचे कारण सांगून तो घराबाहेर पडायचा. सकाळी ६ ते ८ या वेळेत घरातून मोबाइल चोरून पुन्हा टॅक्सीच्या कामावर रुजू होत होता. शनिवारी मात्र तो रंगेहाथ हाती लागला.