बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी यंदा बियाणांच्या विक्रीवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:30 PM2019-05-06T17:30:28+5:302019-05-06T17:32:40+5:30
७ जूनपासूनच शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करण्याच्या सूचना जि.प. कृषी विभागाने दिल्या आहेत.
औरंगाबाद : कपाशीवर पडणारी बोंडअळी आणि नव्याने मक्यावर येणारे अमेरिकन लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी यंदा बियाणे विक्रीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. शासन यंदा १५ मे रोजी कपाशीचे बियाणे कंपन्यांकडून वितरकांना देणार आहे. ३० मेपर्यंत स्वत:च्या गोदामात जतन करून ठेवण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आल्या आहेत. ३० मेनंतर वितरकांमार्फत बियाणे विक्रेत्यांना देण्यास सुरुवात होईल. तरीदेखील प्रत्यक्षात ७ जूनपासूनच शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करण्याच्या सूचना जि.प. कृषी विभागाने दिल्या आहेत.
यासंदर्भात जि.प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे मागील खरीप हंगामात ३ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळे यंदा कपाशीचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यंदा ४ लाख ५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी मक्याला भाव चांगला आल्यामुळे यंदा मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. गेल्या वर्षी १ लाख ७५ हजार हेक्टर मका लागवडीचे क्षेत्र होते, यंदा गत वर्षीपेक्षा १० हजार हेक्टरने मक्याचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ३० हजार ८०० हेक्टरवर तूर होती, ती यंदा ४२ हजार हेक्टरपर्यंत पोहोचेल.
गेल्या वर्षी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी पेरण्यात आली होती, तर यंदा ३० हजार ४०० हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी होण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामासाठी आपल्याकडे सरासरी ४५ हजार १८६ क्विंटल बियाणे वापरले जाते. यंदा ५३ हजार ४०४ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मक्याचे २८ हजार क्विंटल, तर कपाशीचे ११ हजार ३९० क्विंटल. अर्थात, २० लाख बीटी बियाणांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.
तीस निरीक्षकांची राहणार नजर
जिल्हा परिषदेचे १२ व राज्य शासनाच्या कृषी विभागाचे १८, असे एकूण ३० निरीक्षक हे बियाणे, रासायनिक खते, मिश्र खते व कीटकनाशकांच्या विक्रीवर बारकाईने नजर ठेवणार आहेत. प्रामुख्याने विक्रेत्यांनी मिश्रखतांचे बॅचनिहाय नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवायचे आहेत. ते नमुने योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतरच शेतकऱ्यांना त्याची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसानुसार पेरणी करावी
कृषी विकास अधिकारी गंजेवार यांनी सांगितले की, मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ ते ३० जूनदरम्यान पावसानुसार पेरणी करावी. ३० जूननंतर मक्याची पेरणी कटाक्षाने टाळावी. ठरवून दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी पेरणीची ही मोहीम राबवावी. मक्यामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. ४ ओळी मक्याच्या, तर २ ओळी तुरीच्या पेराव्यात, कपाशीची लागवड ७ जूननंतरच करावी. शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड करू नये, तसेच बिगर बीटी बियाणांचीही सक्तीने लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.