औरंगाबाद शहरात येणारी जड वाहने रोखण्यासाठी पोलिसांचे ‘संरक्षक कडे’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 07:21 PM2017-12-07T19:21:55+5:302017-12-07T19:28:53+5:30
‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली.
औरंगाबाद : ‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नो एन्ट्रीमध्ये एकही जड वाहन आणि खाजगी बस शहरात प्रवेश करणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशित केले. यानंतर वाहतूक शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरच जड वाहने रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारल्याचे समोर आले.
याविषयी मिळालेली माहिती अशी की, गत सप्ताहात शहरात तीन वाहन अपघातात चार जणांचे बळी गेले. यात दोन अपघात जड वाहनांमुळे, तर तिसरा अपघात खाजगी बसमुळे झाला होता. जड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी एका अधिसूचनेद्वारे सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत नो एन्ट्री जाहीर केली. शिवाय लक्झरी बसेसनाही सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत नो एन्ट्री दुस-या अधिसूचनेनुसार करण्यात आली. असे असताना शहरात जड वाहने सुसाट घुसखोरी करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वाहतूक विभागातील अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियमांचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. याविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आता सर्व प्रकारची जड वाहने दिवसभर आम्ही शहराबाहेर ठेवणार आहोत. सध्या जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅसची वाहतूक करणा-या वाहनांना प्रवेश दिला जातो. आता या वाहनांना प्रवेश न देण्याविषयी प्रशासन विचार करीत आहे.
आता प्रवेशद्वारावर अडविणार जड वाहने
शहराच्या प्रवेशदारातच जड वाहने अडविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, अशी माहिती सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक एच.व्ही. गिरमे यांनी दिली. ते म्हणाले की, बीड बायपास रोडवरील देवळाई चौकातून शिवाजीनगरमार्गे शहरात येणारी वाहने देवळाई चौकात तर झाल्टा फाटा, सावंगी वळण रस्ता आणि जालन्याकडून येणारी वाहने केम्ब्रिज शाळा चौक, शिवाय चिकलठाणा येथील जुन्या वळण रस्त्यावरही वाहने रोखण्यात येत आहेत. वाहनांचा शहरातील प्रवेश रोखण्यासाठी केम्ब्रिज चौकात दोन, देवळाई चौकात तीन, हर्सूल टी-पॉइंट येथे दोन आणि चिकलठाणा जुना वळण रस्ता येथे एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नियुक्त असेल. वाहतूक पोलिसांसोबत संबंंधित ठाण्याच्या कर्मचाºयांची मदत घेण्यात आली आहे.
तीन दिवसांत ४२ जड वाहनांवर कारवाई
नियम तोडून शहरात आलेल्या ४२ जड वाहने आणि खाजगी बसेसवर प्रत्येकी बाराशे रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडको वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी दिली. या वाहनचालकांकडून ६१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.