प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शहरातील गुन्हे रोखण्यात यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:08 PM2018-12-28T15:08:41+5:302018-12-28T15:12:05+5:30

पोलिसांनी शास्त्रोक्त तपास करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना बेड्या ठोकून जेलमध्ये डांबले

Prevention of crime in the city due to preventive action | प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शहरातील गुन्हे रोखण्यात यश 

प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शहरातील गुन्हे रोखण्यात यश 

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या वर्षात गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविणारशहरात यंदा ११ महिन्यांत झाले ३३ खून, ११६२ चोऱ्या

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी आणि पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात गतवर्षीच्या तुलनेत खुनाच्या घटनांत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी २०१७ मध्ये २४ खून झाले होते. यावर्षी आतापर्यंत शहरात ३३ खून झाले. असे असले तरी पोलिसांनी शास्त्रोक्त तपास करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना बेड्या ठोकून जेलमध्ये डांबले असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

खुनाच्या सर्व घटनांची उकल 
चोऱ्या, घरफोड्यांची उकल करण्यात म्हणावे तसे यश आले नसल्याचे त्यांनी मान्य केले. पोलीस आयुक्त म्हणाले की, गतवर्षी आयुक्तालयाच्या हद्दीत २४ खून झाले. यापैकी २२ खुनांचा उलगडा करण्यात आला होता. २०१८ मध्ये खुनाच्या घडलेल्या सर्वच्या सर्व ३३ घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. गुन्हा घडल्यानंतर तातडीने फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळावरील पुरावे जमा करीत असतात. सीसीटीव्ही फुटेज आणि कोणताही पुरावा नसताना मुकुंदवाडीतील राजनगरमध्ये करण्यात आलेल्या व्यक्तीच्या खुनाचा गुन्हे शाखेने, तर एमजीएममधील आकांक्षा देशमुख खुनाचा उलगडा सिडको पोलिसांनी केला. पोलिसांवर हल्ला करून इम्रान मेहंदीला सोडवून नेण्याचा कट गुन्हे शाखेने उधळून लावला. ३० लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपींना शास्त्रोक्त तपासामुळेच पोलिसांना पकडता आले. हे तपास पोलिसांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न 
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बलात्काराच्या ६८ तक्रारी आल्या. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करून त्यांना अटक केली. शाळा-महाविद्यालयातील मुली, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. ते म्हणाले की, प्रत्येक ठाण्यातील पोलीस दीदी आणि दामिनी पथकातील अधिकारी कर्मचारी शाळा-महाविद्यालय आणि वसतिगृहात जाऊन मुलींच्या भेटी घेतात. विद्यार्थिनींना महिला पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार रोखण्यासाठी विशाखा समिती अध्यक्षांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत.

चोऱ्या घटल्या, मात्र झालेल्या घटनांची उकल नाही
यावर्षीही शहर पोलिसांना चोऱ्या-घरफोड्यांची उकल करण्यात यश आले नाही. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत शहरात ११६२ चोऱ्या झाल्या. यापैकी केवळ २९० चोऱ्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. गतवर्षी १४९४ चोऱ्या झाल्या होत्या. तुलनेत चोऱ्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसते. चोरट्यांनी अकरा महिन्यांत १६७ घरे फोडून कोट्यवधींचा ऐवज पळविला. यापैकी केवळ २९ गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी पकडले. गतवर्षी लुटमारीच्या १५२ घटना घडल्या आणि १२४ केसेसमधील आरोपींना पोलिसांनी पकडले होते. यावर्षी लुटमारीच्या ११९ घटना घडल्या असून, यापैकी ८१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. 

वाहन चोरटे सुसाट
गतवर्षीप्रमाणे २०१८ मध्येही शहरातील विविध वसाहतींतून दुचाकी आाणि चारचाकी वाहन चोरीचे सत्र जोरात सुरू होते. वर्षभरात चोरट्यांनी ६५८ वाहने पळविली. यापैकी १३७ केसेसमधील वाहने चोरट्यांकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे गतवर्षी ६३८ वाहने चोरीला गेली आणि त्यापैकी १६८ वाहने चोरट्यांकडून परत मिळविण्यात पोलिसांना यश आले होते. यासोबतच वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातांची संख्या घटली. मात्र, मृतांचा आकडा वाढल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. 

सरकारी नोकरांवरील हल्ल्याच्या ६८ घटना
सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या अकरा महिन्यांत ६८ घटना घडल्या. गतवर्षीच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या चार घटना यंदा वाढल्या. 

७३ प्राणघातक हल्ले
शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्याच्या ७३ घटनांची नोंद झाली. गतवर्षीपेक्षा प्राणघातक हल्ल्यामध्ये ११ ने घट झाली. विशेष म्हणजे हे हल्ले करणाऱ्या ७२ केसेसमधील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

२० महिलांचे मंगळसूत्र पळविले
या कालावधीत चोरट्यांनी २० महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या पळविल्या. दहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या पळविणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. 

३ हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शहरातील गुन्हे रोखण्यासाठी २०१८ मध्ये तब्बल ३ हजार ३३ गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. यात तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १०३ गुंडांना पकडले. एमपीडीएखाली पाच जणांना हर्सूल कारागृहात डांबल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पाच पिस्टल जप्त
आकाशवणी चौकात अपघातात जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे पिस्टल चोरून नेणाऱ्यास पोलिसांनी पकडून त्याच्याकडून पिस्टल जप्त केले. यासोबत छुप्या मार्गाने पिस्टल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे शाखेने दोन, तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोन पिस्टल जप्त केले. गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस आयुक्तालयातून विशेष प्रयत्न केला जात असल्याने सत्र न्यायालयीन खटल्यांमधील आरोपींच्या दोषसिद्धीचे प्रमाण ३४ टक्क्यांपर्यंत, तर प्रथमवर्ग न्यायालयीन केसेसमधील दोषसिद्धीचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत वाढले. नव्या वर्षातही दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

Web Title: Prevention of crime in the city due to preventive action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.