अगोदर केले गाव पाणीदार, आता वळले वृक्षलागवडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:05 AM2021-07-22T04:05:42+5:302021-07-22T04:05:42+5:30
फुलंब्री : तालुक्यातील वावना येथील गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशनच्या सहकार्यातून अगोदर गाव पाणीदार केले. आता दोन संस्थांच्या मदतीने तीन एकर ...
फुलंब्री : तालुक्यातील वावना येथील गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशनच्या सहकार्यातून अगोदर गाव पाणीदार केले. आता दोन संस्थांच्या मदतीने तीन एकर क्षेत्रात १७ हजार झाडे लावण्याच्या कामाला ग्रामस्थ जुटले असून मंगळवारी तहसीलदारांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
तालुक्यातील वावना या गावाने २०१८ मध्ये पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेऊन जलसंधारणाचे उत्कृष्टपणे काम केल्याने गावाला तिसरे बक्षीस मिळून गाव पाणीदार झालेले आहे. गावकऱ्यांचे सहकार्य व गाव विकासासाठी सतत प्रयत्न करीत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून दोन संस्था गावाला जोडल्या गेल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून माथा ते पायथ्यापर्यंतची विविध विकासकामे सुरू आहेत. सीएसआर फंडातून या संस्था गावाच्या विकासकामात मदत करीत आहेत. मंगळवारी तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांच्या हस्ते या घनवन लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी विलास गंगावणे, तालुका कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे, तलाठी थोरात, ग्रामसेविका इंगोले, सरपंच सोमीनाथ जाधव, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अस्लम बेग, तांत्रिक प्रशिक्षक प्रशांत गवंडी जलमित्र व गावकरी उपस्थित होते.
चौकट.....
घनवन तयार करणार
गावाच्या हद्दीत असलेल्या ३ एकर गायरान जमिनीत मियावाकी पद्धतीने कमी जागा, कमी वेळेत घनवन तयार केले जाणार आहे. या क्षेत्रामध्ये १७ हजार वृक्षांची लागवड केली जात आहे. यात सीताफळ, लिंब, सिसम, पिंपळ, वड, उंबर आदी झाडांचा समावेश आहे.
फोटो : तहसीलदार डॉ. शीतल राजपूत वृक्षलागवड करताना.
210721\21_2_abd_111_21072021_1.jpg
वावना येथे वृक्ष लागवड करताना तहसीलदार शीतल राजपूत.