किंमत लपविली जात असल्याने राफेल खरेदीत नक्की भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:44 PM2018-12-16T22:44:12+5:302018-12-16T22:46:30+5:30
‘राफेल विमान खरेदीत सातत्याने किंमत लपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून घटनात्मक व कायद्याने निर्मित संस्थांवर घाला घातला जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच चुकीच्या माहितीवर आधारित निकाल दिला. आता विश्वास तरी कुणावर ठेवावा, असा प्रश्न साहजिकच निर्माण होत आहे.
औरंगाबाद : ‘राफेल विमान खरेदीत सातत्याने किंमत लपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून घटनात्मक व कायद्याने निर्मित संस्थांवर घाला घातला जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच चुकीच्या माहितीवर आधारित निकाल दिला. आता विश्वास तरी कुणावर ठेवावा, असा प्रश्न साहजिकच निर्माण होत आहे. याचा आता जनतेनेच गांभीर्याने विचार करावा’ असे आवाहन आज येथे उत्तम संसदपटू, अभ्यासू राजकारणी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. या विषयावरची त्यांची मांडणीच इतकी जबरदस्त होती की, ती ऐकून सारेच जण प्रभावित झाले आणि सध्या देशात या मुद्यावरून उठलेले वादळ नेमके काय आहे, याचे आकलन झाले. पृथ्वीराजबाबांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला साजेसे आजचे हे विश्लेषण होते व ते ऐकून केंद्र सरकारकडून होणारी लपवाछपवी, नियम धाब्यावर बसवून चाललेला कारभार याचा पर्दाफाशच झाला.
ताकदीने व खुबीने दिली उत्तरे
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात ‘राफेल विमान खरेदी : भ्रम आणि वास्तव’ या विषयाची ही मांडणी पॉवर प्रेझेटेंशनद्वारे करून झाल्यावर चव्हाण यांनी उपस्थितांशी केलेला संवादही लक्षात राहण्यासारखा ठरला. विचारलेल्या प्रश्नांना पृथ्वीराजबाबांनी तेवढ्याच ताकदीने आणि खुबीने उत्तरे दिली व भाजप विचारसरणीच्या एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारण्याच्या आडून भाषणबाजी सुरू केली तेव्हा, त्याला समर्पक उत्तर देऊन निरुत्तर केले. फ्रेंडस् आॅफ डेमॉक्रसी अँड युथ आॅफ डेमॉक्रसीच्या वतीने आयोजित या आगळ्या-वेगळ्या विषयावरील पृथ्वीराजबाबांचे व्याख्यान ऐकण्यासाठी समाजातील सर्व घटक आवर्जून उपस्थित होते. यात विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, राजकारणी, समाजकारणी, महिला, वकील, आर्किटेक्ट आदींची लक्षणीय उपस्थिती राहिली आणि पृथ्वीराजबाबांच्या प्रभावी मांडणीस सर्वांचाच पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले. नाव न घेता निर्देश जरी ते करीत होते, तरी उपस्थितांच्या ते लक्षात येत होते आणि त्यावर टाळ्यांचा कडकडाटही होत होता. आज बांगलादेश विजय दिन. मुंबई, नाशिक आणि आज औरंगाबादला पृथ्वीराजबाबांची राफेलवर व्याख्याने झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
तोलामोलाच्या माणसांची उपस्थिती....
मंचावर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी एकच खुर्ची होती. अर्थात त्यांनाही पॉवर प्रेझेंटेशन देण्यासाठी बराच वेळ उभे राहावे लागले. मात्र उपस्थितांमध्ये तेवढ्याच तोलामोलाची माणसे बसली होती. पहिल्या रांगेत माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार सुभाष झांबड, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, माजी खासदार उत्तमसिंग पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे, माजी आमदार धोंडिराम राठोड, माजी मंत्री अनिल पटेल, रंगनाथ काळे यांच्यासह मान्यवर मंडळी बसून हे व्याख्यान ऐकत होती. संसदीय कामकाज कसे असते, हे राजेंद्र दर्डा आणि उत्तमसिंग पवार यांना माहीत आहे, असा उल्लेख पृथ्वीराजबाबांनी यावेळी केला.
वंदेमातरमने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अॅड. राज कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मानसिंग पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा बुके देऊन सत्कार केला. शेवटी प्रदीप पाटील यांनी आभार मानले. माजी न्यायाधीश डी. आर. शेळके, आर्किटेक्ट नाडकर्णी, अॅड. खंडागळे पाटील, संजय खनाळे, डॉ.बाळासाहेब पवार, अॅड. नरहरी कांबळे, संजय पाटील, शेखर मगर, तनसुख झांबड, कॉ.अभय टाकसाळ आदींनी प्रश्न विचारले. संजय खनाळे यांनी प्रश्न विचारण्याच्या आडून काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केल्यानंतर उपस्थितांनीच त्यांना खाली बसविले.
यूपीए सरकारच्या काळात काही झाला नाही खोडसाळ प्रचार....
राफेल विमान खरेदी कराराच्या बाबतीत यूपीए सरकारने काही केले नाही, हा प्रचार खोडसाळपणाचा कसा हे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना राफेल विमानाची वाढीव किंमत मान्य नव्हती. ते आता आजारी आहेत, पण काय घडले ते बोलले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राफेल विमानाची किंमत तीनपट वाढते आणि विमानांची संख्या तीनपट घटते याला आधार काय? शेवटी हा पैसा जनतेचा आहे. तो अशा पद्धतीने वाटायला सरकार म्हणजे काही धर्मादाय संस्था आहे का? तीस हजार कोटी अंबानीच्या खिशात घातले, हे सहज शक्य आहे का? असे सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. प्रक्रिया, किंमत, आॅफसेट म्हणजे काय? किमतीचा मुद्दा कळीचा असून, जगात कुठेही विमान खरेदीतील किंमत गुप्त राहत नाही. किंमत किती हे जाणून घेण्याचा देशवासीयांना अधिकार आहे. शिवाय विकिपीडिया, गुगल वेबसाईटवर गेल्यानंतर किंमत सहज कळते, याकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधले.