मोसंबीला आला सोन्याचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:02 AM2021-06-11T04:02:17+5:302021-06-11T04:02:17+5:30
पाचोड : मोसंबीची आवक कमी असल्यामुळे कोरोनाच्या काळात मोसंबीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आंबा बहार मोसंबीला तर आता ...
पाचोड : मोसंबीची आवक कमी असल्यामुळे कोरोनाच्या काळात मोसंबीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आंबा बहार मोसंबीला तर आता सोन्यासारखा भाव मिळू लागल्याने मोसंबी व्यापारी सुखावला आहे. पाचोडच्या मोसंबी बाजारात प्रतिटन तीस ते चाळीस हजार रुपये भाव मिळू लागला आहे, तर पंचवीस ते पस्तीस टन मोसंबी विक्रीसाठी पाचोडच्या मार्केटमध्ये येत आहे.
मोसंबीचे माहेरघर म्हणून पाचोड बाजाराची ओळख आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची मोसंबी सातासमुद्रापार गेलेली आहे. रोहयोमंत्री संदीपान भुमरे व सभापती राजू भुमरे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांनी आपली मोसंबी डोळ्यासमोर विकावी म्हणून पाचोड बाजार समितीच्या आवारात मोसंबी मार्केट सुरू केले. दरवर्षी आंबा बहारमधील मोसंबी व मृग बहारमधील मोसंबी शेतकरी हक्काने पाचोड बाजारात विक्रीसाठी आणतो.
पाचोड शिवारातील गावागावांत मागील वर्षी अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकाचे नुकसान झाले. परिणामी बाजारात मोसंबीची आवक कमी झाली. तर आता आंबा बहार मोसंबीला सोन्यासारख्या भाव मिळू लागला आहे. सद्य:स्थितीत बाजारात २५ ते ३५ टन मोसंबीची बाजारात आवक आहे. परिणामी मोसंबीला तीस ते चाळीस हजार रुपये प्रतिटन भाव मिळू लागला आहे. मोसंबीची आवक जर अशीच कमी राहिली तर मोसंबीचे आणखी भाव वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.
कोरोनामुळे वाढली मागणी
मागील दीड वर्षापासून कोरोनाने कहर घातला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना तसेच सर्व नागरिकांकडून मोसंबी रसाची मागणी वाढू लागली. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोसंबीला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. येथील मोसंबीला राज्यातील अन्य बाजारातदेखील चांगली मागणी होत आहे. परिणामी मोसंबीला सोन्यासारखा भाव वाढला आहे.
--
पाचोड बाजारात मोसंबी विक्रीसाठी शेतकरी दाखल होत आहेत. मोसंबीची आवक कमी झाल्यामुळे मोसंबीचे भाव वाढले. चांगल्या प्रतीच्या मोसंबीला तीस ते चाळीस हजार रुपये टन भाव मिळत आहे. पाचोड बाजारातून मुंबई, दिल्ली, बंगलोर, कोलकातासह विदेशातदेखील मोसंबी पाठविली जाते.
- शिवाजी भालसिंगे, मोसंबीचे व्यापारी
100621\10_2_abd_8_10062021_1.jpg
पाचोड बाजारातील मोसंबीचा फोटो