औरंगाबाद बाजारपेठेत मध्यप्रदेशातील गव्हाला चढला ‘भाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:44 AM2019-01-08T11:44:32+5:302019-01-08T11:44:32+5:30

बाजारगप्पा : राज्यात दुष्काळामुळे गव्हाचा पेरा कमी झाला आहे.

price rises of Wheat from Madhya Pradesh in Aurangabad market | औरंगाबाद बाजारपेठेत मध्यप्रदेशातील गव्हाला चढला ‘भाव’

औरंगाबाद बाजारपेठेत मध्यप्रदेशातील गव्हाला चढला ‘भाव’

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद )

राज्यात दुष्काळामुळे गव्हाचा पेरा कमी झाला आहे. आता संपूर्णपणे परराज्यातील गव्हावर अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, मध्यप्रदेशातील गव्हाला ‘भाव’ चढला आहे. पुन्हा एकदा गहू क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांनी वधारला आहे. गेल्या आठवड्यात थंडीमुळे बाजरीला मागणी वाढली होती, तर  सर्वप्रकारच्या डाळींचे भाव स्थिर होते. 

नवीन वर्षातील पहिला आठवडा बाजारपेठेसाठी जेमतेम राहिला. कारण, महिन्याच्या किराणा सामान खरेदीसाठी किराणा दुकानात गर्दी होती; पण अन्य बाजारपेठेत व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसून आले. यावर्षीही मराठवाडा दुष्काळाला सामोरे जात आहे. मागील तीन दशकांत महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन घटले आहे. गरजेएवढाच शेतकरी गहू पेरत असतात; पण यंदा तेवढ्याही गव्हाची पेरणी झाली नाही. ज्यांच्या विहिरीत पाणी आहे तेथेच गहू जगविला जात आहे. मागील आठवड्यात बाजार समितीमध्ये शेतकरी गहू खरेदी करताना दिसून आले. नवीन गहू मार्चपर्यंत बाजारात येणार आहे. यामुळे एक  ते दीड क्विंटल गहू शेतकरी खरेदी करीत होते.

यंदा मराठवाड्याला मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या गव्हावर संपूर्ण अवलंबून राहावे लागणार आहे. मागील आठवड्यात मध्यप्रदेशात सरकारी गव्हाचे टेंडर क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांनी चढ्याभावात निघाले. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेत झाला. येथे शनिवारी २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल गहू विक्री झाला, तर शरबती गहू २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. तर सर्वात हलका मिलबर गहू २३०० ते २३५० रुपये क्विंटल विकत आहे. मागील आठवड्यात बाजारपेठेत ६०० टन गहू विकला गेला. गव्हाचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, मध्यप्रदेशात गव्हाचा पेरा चांगला आहे तसेच थंडी पडल्याने पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नवीन गव्हाचे उत्पादन विक्रमी होईल, अशी शक्यता मध्यप्रदेशातील व्यापारी व्यक्त करीत आहेत. थंडी वाढल्याने बाजरीला मागणी वाढली आहे. १९५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलने २०० ते २५० टन बाजरी आठवडाभरात विक्री झाली. ज्वारी २४५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. 

मागील आठवड्यात डाळींचे भाव स्थिर राहिल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. यात हरभरा डाळ ५३०० ते ५७०० रुपये, मसूर डाळ ४६५० ते ५००० रुपये, मूगडाळ ६८०० ते ७२०० रुपये, तूरडाळ ६००० ते ६५०० रुपये तर उडीदडाळ ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. 

नवीन बासमतीची आवक
मागील आठवड्यात पंजाब व हरियाणा राज्यातून नवीन बासमतीची आवक झाली. ४००० रुपये ते १०२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बासमती विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी बासमती महाग विक्री होत आहे. चालू महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून नवीन तांदळाच्या बहुतांश व्हरायटी बाजारात येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: price rises of Wheat from Madhya Pradesh in Aurangabad market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.