औरंगाबादेत उत्पादन घटल्याने तिळाचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:59 AM2018-12-04T11:59:00+5:302018-12-04T11:59:36+5:30
बाजारगप्पा : पुढील महिन्यात संक्रांत सण असल्याने आणखी भाव वाढतील
- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद )
देशात उत्पादन घटल्याच्या बातमीमुळे तिळाचे भाव वधारले आहेत. विशेष म्हणजे पुढील महिन्यात संक्रांत सण असल्याने आणखी भाव वाढतील यामुळे व्यापाऱ्यांनी तिळाचा साठा करून ठेवणे सुरू केले आहे. मागील महिनाअखेरीचा आठवडा होता. यामुळे बाजारपेठेतील उलाढाल थंडावली होती. जाधववाडीतील अडत बाजार व मोंढ्यातील धान्याच्या होलसेल बाजारात वर्दळ कमालीची घटली होती; मात्र शनिवार, १ डिसेंबरपासून किराणा दुकानात महिन्याचे सामान भरणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहण्यास मिळाली.
रविवारीही गर्दी कायम होती. अनेक किराणा दुकानांत ग्राहकांनी सामानाच्या याद्या आणून दिल्या आहेत. तिळाची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी ६० टक्के विक्री संक्रांतीला होत असते. यंदा महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात या तीळ उत्पादक राज्यांत तिळाचे उत्पादन कमी आहे. मध्यप्रदेशात समाधानकारक उत्पादन असल्याचे सांगितले जाते. नवीन तिळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. उत्पादन कमी असल्याने तिळाचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत वधारले आहेत. मागील संक्रांतीदरम्यान १०० रुपये किलोने तीळ विक्री झाली होती.
यंदा डिसेंबर महिन्यातच नवीन तिळाचे भाव १६० ते १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत सध्या तीळ किलोमागे चक्क ६० ते ७० रुपयांपर्यंत महागली आहे. यात आणखी भाववाढ होण्याची शक्यता लक्षात घेता किराणा व्यापाऱ्यांनी आधीच दुकानात मुबलक साठा करून ठेवणे सुरू केले आहे. म्हणून मागील आठवड्यात तिळाची विक्री वाढली होती.
देशांतर्गत बाजारातील साखरेच्या पुरवठ्यावर नियंत्रण राहावे, यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे महिन्याचा साखर कोटा जाहीर करणे सुरू केले आहे. यामुळे साखर कारखान्यांना साखर विक्रीला मर्यादा घालून दिल्या आहेत.
राज्यातील साखर कारखान्यांचे लक्ष डिसेंबरच्या साखर कोट्याकडे लागले होते. कारण, साखर कोटा कमी-जास्त जाहीर झाला तर त्यानुसार बाजारात त्वरित भावात तेजी-मंदी येते. डिसेंबर महिन्यासाठी १९.५० लाख मेट्रिक टन साखर कोटा केंद्र सरकारने जाहीर केल्याची बातमी शनिवारी बाजारपेठेत पसरली. मागणीच्या तुलनेत साखर कोटा कमी असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले; मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने साखरेच्या भावावर त्वरित परिणाम दिसून आला नाही. साखर एस (बारीक) ३१०० रुपये, सुपर एस (मध्यम) ३२०० रुपये, तर एम (जाड) ३२५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली.
साखर भावातील तेजी-मंदी टेंडर निघाल्यावर लक्षात घेईल, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.सर्वसामान्य ग्राहकांचे गहू, ज्वारी, बाजरी व डाळींच्या भावावर अधिक लक्ष असते; मात्र यात मागील महिनाभरात मोठी तेजी झाली. यामुळे ग्राहकांनी खरेदीतून हात आखडता घेतला. परिणामी मागील दोन आठवड्यांपासून भाव स्थिर आहेत, तसेच तांदळाचेही भाव स्थिर होते. आता नवीन तांदळाची आवक सुरू आहे.