हमीभाव वाढताच बाजारात महागल्या डाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:28 AM2018-07-08T01:28:59+5:302018-07-08T01:29:18+5:30
केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औैरंगाबाद : केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी कापसापासून ते तुरीपर्यंतच्या पिकाचे हमीभाव वाढविले आहेत. यात उडीद २०० रुपयांनी वाढून ५६०० रुपये, ज्वारी ७३० रुपयांनी वाढवून २४३० रुपये, तर मुगाच्या हमीभावात १४०० रुपये वाढ करीत ६९७५ रुपये दिला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला तर त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे; मात्र हमीभाव वाढीच्या नावाखाली व्यापाºयांनी आताच डाळींचे भाव वाढविले आहेत. व्यापारी आणि डाळ मिल चालकांकडे गतवर्षीच्या हमीभावानुसार खरेदी केलेली डाळ आहे. मागील हंगामातील डाळी व्यापाºयांकडे मोठ्या प्रमाणावर आहेत; मात्र आता सरकारने शेतकºयांना वाढीव हमीभाव जाहीर केल्यानंतर हमीभाव वाढीच्या नावाखाली मागील हंगामातील डाळींचे भाव आता वाढविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे साठेबाजांनी आपले उखळ पांढरे करणे सुरू केले आहे.
अशी झाली दरवाढ
मागील हंगामातील मूग डाळ ८०० ते १००० रुपयांनी कडाडून ६८०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल दराने शुक्रवारी आणि शनिवारी विकली जात होती. हरभरा डाळ ३०० रुपयांनी वधारून ४२०० ते ४५०० रुपये, मसूर डाळ, २०० रुपयांनी महागून अनुक्रमे ४५०० ते ५२०० रुपये व ४६०० ते ४८०० रुपये, तर तूर डाळीत १५० रुपयांनी वाढ होत ५३०० ते ५५०० रुपये, तर मठ डाळ १०० रुपयांनी वधारून ५२०० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.
व्यापाºयांनी सांगितले की, डाळींच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ होऊ शकते. परिणामी याचा फटका सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. नवीन मूग व उडीद डाळ बाजारात येण्यास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तूर डाळ डिसेंबर-जानेवारीत, तर हरभरा डाळ मार्च महिन्यात बाजारात येईल. कर्नाटकात उन्हाळी मूग मोठ्या प्रमाणात आल्याने मध्यंतरी मुगाचे भाव घटले होते.
मागील हंगामातील मूग, तूर, उडीद, मठ, हरभरा, मसूर शेतकºयांनी विकून टाकली आहे. आता सर्व डाळींचा बंपर साठा डाळ मिल व साठेबाजांच्या हातात आहे. हमीभावाचा फायदा आगामी खरीप हंगामात पीक आल्यानंतरच होणार आहे; पण त्याआधीच मागील वर्षीच्या कमी भावात खरेदी केलेल्या डाळी चढ्या भावात विकून साठेबाज ग्राहकांना चुना लावत आहेत.