सणासुदीत डाळी १५ रुपये किलोने महागल्या; पाऊस नसल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:31 AM2017-08-19T00:31:42+5:302017-08-19T00:31:42+5:30
बाजारात सर्वच डाळींचे भाव किलोमागे पंधरा रुपयांनी वाढले आहेत. ऐन सणासुदीत महागाईने हळूच शिरकाव केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चाळीस दिवस पावसाचा खंड राहिल्याने पुढील कालावधीतील पिकांचा अंदाज येणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच उत्पादनात घट येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परिणामी बाजारात सर्वच डाळींचे भाव किलोमागे पंधरा रुपयांनी वाढले आहेत. ऐन सणासुदीत महागाईने हळूच शिरकाव केला आहे.
मागील वर्षी पाऊसकाळ चांगला राहिल्याने बंपर पीक आले. त्यामुळे शंभर ते दीडशेच्या घरात पोहचलेल्या डाळींचे भाव निम्म्यावर आले. साठ ते सत्तर रुपये किलो डाळींचे भाव होते. यात साधारण पाच ते सात रुपयांची तेजी- मंदी होत होती.
यावर्षी जूनमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली. परंतू नंतर जुलै व आॅगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने बाजारावर त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली.
तेल तेजीत, पण स्थिर
सरकारने आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.
६० रुपयांचे पामतेल ६५, ७५ रुपयांचे सोयाबीन ८०, ९० रुपयांचे सूर्यफूल ९५ रुपये किलो विकले जात आहे. शेंगदाणा तेलाचे भाव
मात्र ११० रुपये किलो स्थिर आहेत. परंतु करडी तेलाचे भाव १४५ ते १५० रुपयांपर्यंत वाढले आहेत.