मराठवाडा विकासाचा ध्यास असणारे प्राचार्य शरद अदवंत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:21 PM2021-03-20T12:21:23+5:302021-03-20T12:23:57+5:30
मराठवाडा विकास व अनुशेष आणि मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासह सर्वांगीण प्रश्नांच्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
औरंगाबाद : मराठवाडा जनता विकास परिषद व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विकास संशोधन संस्थेचे सचिव तथा सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. शरद अदवंत (७९) यांचे शुक्रवारी रात्री उशीरा अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी तसेच सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मराठवाडा विकास चळवळीत सुरूवातीपासून सक्रीय सहभाग असलेले डॉ. अदवंत यांनी अनेक सामाजिक संस्था-संघटनांमधून आपले योगदान दिले. पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ना.वि. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार दशकांहून अधिक काळ विकास चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला असून अद्यापपर्यंत त्यांचे कार्य सुरू होते. मूळ पैठण तालुक्यातील डॉ. अदवंत यांनी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन केले. या महाविद्यालयात त्यांनी १९८५ ते २००३ पर्यंत प्राचार्यपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कुशल प्रशासन आणि निरपेक्ष भावनेने त्यांनी आपले स्थान निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. प्राचार्य महासंघाच्या अध्यक्षपदीही कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सिनेट सदस्य, तसेच नॅक कमिटी सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. ‘उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन’ यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष सेल स्थापन केला होता, या सेलचे सदस्य म्हणून त्यांनी काम करत राज्यभरात सहा कार्यशाळा आयोजित करुन शासनाला अहवाल सादर केला. गुणवत्तावाढीच्या उपक्रमाला दिशा दिली.
मराठवाड्यासह राज्यभरात अनेक शैक्षणीक संस्थांमधून डॉ. अदवंत यांनी शैक्षणीक नेतृत्त्व, मराठवाड्यातील शैक्षणीक सुविधा आणि प्रश्न अशा विषयावर सातत्याने परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करुन शैक्षणीक चळवळ उभी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अमरावती व नागपूर विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमधून तज्ज्ञ सल्लागार-मार्गदर्शक म्हणून काम केले. डॉ. अदवंत यांनी सहा विविध पुस्तकांचे लेखन आणि सपादन केले होते. निवृत्तीनंतरच्या काळात पूर्णवेळ सामाजिक संघटना-संस्थांमधून स्वत:ला व्यस्त केले होते. मराठवाडा विकास व अनुशेष आणि मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासह सर्वांगीण प्रश्नांच्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
संशोधन संस्थेच्यावतीने श्रद्धांजली
शनिवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या वतीने डॉ. शरद अदवंत यांना ऑनलाईन व्यासपीठावरुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाने संस्थेची अपरिमित हानी झाल्याची भावना सर्व सदस्यांनी व्यक्त केली. यावेळी सुरेश देशपांडे, सारंग टाकळकर, रा.शं. बालेकर, प्रा. जीवन देसाई, अॅड. प्रदीप देशमुख, डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. मकरंद पैठणकर, डॉ. मोहन फुले, पी.एस. कुलकर्णी, सतीश शिरडकर, सुहास पाठक, मुकुंद कुलकर्णी यांनी श्रद्धांजली वाहिली.