बनावट मतदार कार्ड बनविणाऱ्या डिजिटल केंद्रावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:02 AM2021-02-12T04:02:02+5:302021-02-12T04:02:02+5:30

औरंगाबाद : बनावट मतदार कार्ड बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या गजानन कॉलनीतील डिजिटल केंद्र आणि महा ई सेवा केंद्रावर ...

Print on a digital center that makes fake voter cards | बनावट मतदार कार्ड बनविणाऱ्या डिजिटल केंद्रावर छापा

बनावट मतदार कार्ड बनविणाऱ्या डिजिटल केंद्रावर छापा

googlenewsNext

औरंगाबाद : बनावट मतदार कार्ड बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या गजानन कॉलनीतील डिजिटल केंद्र आणि महा ई सेवा केंद्रावर पुंडलिकनगर पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री छापा टाकून दोन जणांना अटक केली. आरोपींकडून संगणक, प्रिंटर आणि मोबाईल आदी साहित्य जप्त केले.

हरीश धुराजी वाघमारे (वय २२) आणि नवनाथ भक्तदास शिंदे (२६) अशी आरोपींची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन कॉलनीतील मातोश्री डिजिटल या दुकानात बनावट मतदार कार्ड तयार केले जाते, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनवणे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या दुकानावर बनावट ग्राहक पाठवून, नवीन मतदार कार्ड तयार करून देता का, अशी विचारणा करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांचा पंटर ग्राहक बनून तेथे गेला. त्याने केलेल्या मागणीनुसार हरीश वाघमारे याने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून डाटा मिळविला. या डाट्यामध्ये मतदाराचे केवळ नाव आणि पत्ता, वय असते छायाचित्र नसते. त्याने ग्राहकाचे नवीन पासपोर्ट साईज छायाचित्र घेऊन ओळखपत्र तयार केले. यावर निवडणूक विभागाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याची बनावट इलेक्ट्रॉनिक ॲटोमॅटिक सही चिकटवली. यानंतर या मतदार कार्डचे स्मार्ट कार्ड तयार करून देण्यासाठी त्याने त्याचा मित्र नवनाथ शिंदे याच्या महा ई सेवा केंद्राच्या ई मेलवर पाठविले. शिंदे हा मतदार कार्डचे स्मार्ट कार्ड तयार करून देण्याचे काम करतो. पोलिसांनी तेथील साहित्य जप्त केले आणि आरोपीसह महा ई सेवा केंद्रावर धाड टाकली. तेथे संगणक, प्रिंटर असा सुमारे ३९ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे, स.पो.नि. सोनवणे, फौजदार विकास खटके, प्रभाकर सोनवणे, हवालदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ आणि माया उगले यांनी ही कारवाई केली.

Web Title: Print on a digital center that makes fake voter cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.