साजापुरातील विनापरवाना बायो डिझेल पंपावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:05 AM2021-09-15T04:05:02+5:302021-09-15T04:05:02+5:30
वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूर शिवारात एटीएफ ट्रान्सपोर्ट येथे विना परवाना सुरु असलेल्या बायो डिझेल पंपावर मंगळवारी दुपारी ...
वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूर शिवारात एटीएफ ट्रान्सपोर्ट येथे विना परवाना सुरु असलेल्या बायो डिझेल पंपावर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पथकाने १६ हजार लिटर डिझेल, एक ट्रक व डिझेल टाकण्याचे साहित्य असा जवळपास २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साजापूर शिवारात विनापरवाना बायो डिझेल पंप सुरु असल्याची माहिती मंगळवारी दुपारी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूर शिवारात एटीएफ ट्रान्सपोर्ट येथे विना परवाना सुरु असलेल्या बायो डिझेल पंपावर छापा मारला. त्याठिकाणी ट्रकमध्ये (एमएच २०- डीई- ३४२२) मोठ्या टाकीतून इलेक्ट्रॉनिक्स पंपाद्वारे बायो डिझेल भरले जात होते. यावेळी पोलीस पथकाने पुरवठा विभागाशी संपर्क साधने या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळताच पुरवठा निरीक्षक अनुराधा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी आले व पंचनामा केला. या कारवाईत पोलीस पथकाने १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे जवळपास १६ हजार लिटर बायो डिझेल, १० लाखांचा ट्रक, १ लाखाचे इलेक्ट्रॉनिक्स मशीन असा जवळपास २२ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ट्रान्सपोर्टच्या मैदानात अनेक ट्रक व मालवाहतूक करणारी वाहने उभी असून त्यात अवैधरीत्या बायो डिझेल भरले जात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.
४ जणाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा ट्रान्सपोर्टचा मालक सय्यद इरफान सय्यद हसन (रा. कैसर कॉलनी), कामगार जमील अय्याज कुरैशी (रा. श्रीरामपूर), शेख रहिम शेख रशदी (रा. कैसर कॉलनी) व ट्रकमध्ये डिझेल भरणारा चालक शेख इम्रान शेख उस्मान (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे अगोदरही या बायो डिझेल पंपावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतरही सय्यद इरफानने पुन्हा अवैधरीत्या बायो डिझेल विक्री सुरुच ठेवली होती. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, राजेंद्र बांगर, सहा. उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, पोकॉ. किरण गावंडे, संजयसिंग राजपुत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, अविनाश ढगे, नितीन देशमुख, जालिंदर रंधे आदींनी यशस्वी केली.
फोटो ओळ- साजापूर शिवारातील एटीएफ ट्रान्सपोर्ट येथे विनापरवाना सुरु असलेल्या बायो डिझेल पंपावर गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा मारुन पंप सील केला.
फोटो क्रमांक- कारवाई १/२/३/४
-------------------------