आचारसंहितेपूर्वी ‘बसपोर्ट’चे भूमिपूजन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:51 PM2019-07-16T23:51:30+5:302019-07-16T23:51:53+5:30
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचा नारळ फुटणार आहे.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचा नारळ फुटणार आहे. बसपोर्टची निविदा प्रक्रिया सुरू असून, मुंबईत प्री-बीड बैठक झाली. यावेळी कंत्राटदारांनी बसपोर्ट उभारण्यासंदर्भात रुची दर्शविल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
मध्यवर्ती बसस्थानकात बसपोर्ट उभारण्यात येणार होते. मात्र, खासगी भांडवलदार निविदा भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसटी महामंडळाने सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्सफर-लीज’ तत्त्वावर आधुनिक बसपोर्टसह व्यापारी संकुल बांधून महामंडळास विनामूल्य हस्तांतर करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यासंदर्भात मुंबई येथे प्रक्रिया सुरू आहे.
ही सर्व प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बसपोर्टचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. त्या सगळ्यासाठी निविदेला कंत्राटदारांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे महामंडळाचे लक्ष आहे.
बसपोर्टबरोबर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. ७ आॅगस्ट रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. १३.६५ कोटी रुपये खर्चून मध्यवर्ती बसस्थानक बांधण्यात येणार आहे.
प्रवेशद्वार, बसपोर्ट जळगाव रस्त्याकडे
बसपोर्टचे प्रवेशद्वार, बसपोर्टची इमारत जळगाव रस्त्याकडे म्हणजे सर्व्हिस रोडच्या बाजूने ‘एल’आकारात उभारण्यासंदर्भात नियोजन केले जात आहे. त्यासाठी सिडको बसस्थानक परिसरातील प्रादेशिक कार्यालयाची इमारतही पाडली जाईल. व्यापारी संकुलांना प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने हा विचार केला जात आहे.