पाणीपुरवठ्याला आधी प्राधान्य द्या
By Admin | Published: October 3, 2016 12:27 AM2016-10-03T00:27:29+5:302016-10-03T00:34:01+5:30
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला.
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला. त्यानंतर लगेचच संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचा ताबा प्रशासनाने घेतला. रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या, ठिकठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. गळती युद्धपातळीवर बंद करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.
महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला तब्बल २९५ लाईनमन दिले होते. मागील दोन वर्षांमध्ये काही लाईनमन मरण पावले. काही निवृत्त झाले. २९ कर्मचारी दोन वर्षांमध्ये कमी झाले. रविवारी सकाळी मनपाने कंपनीकडून २६७ लाईनमन ताब्यात घेतले. नियोजित वेळापत्रकानुसारच शहरातील सर्व लाईनमन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठा कुठेच विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी.
बैठकीस उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एस.ए. चहल, उपअभियंता के.एम. फालक, यू.जी. शिरसाट, मिस्कीन, पद्मे आदींची उपस्थिती होती.
शहराच्या विविध वसाहतींमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात आहेत. कालपर्यंत कंपनीकडे दुरुस्तीचे काम करणाऱ्या वेंडर बांधवांकडून लिकेज दूर करण्याचे काम करून घ्यावे. मनपाच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, सोमवारी ही निविदा उघडण्यात येईल.