शहरात शांतता आणि गुन्हे नियंत्रणाला प्राधान्य : निखिल गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 05:44 PM2020-09-05T17:44:54+5:302020-09-05T17:47:31+5:30
शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी मावळते आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडून पदभार स्वीकारला.
औरंगाबाद : शहरात शांतता ठेवणे, गुन्हे नियंत्रण आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यास आपले प्राधान्य असल्याचे नूतन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शुक्रवारी सांगितले.
शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी मावळते आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या शहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले असल्याने पोलीस आयुक्त म्हणून पुन्हा येथे रुजू होत असल्यामुळे घरी आल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यम आणि जनतेला सोबत घेऊन काम करायचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलीस आयुक्त प्रसाद यांचे काम पुढे न्यायचे असल्याचे ते म्हणाले.
जनतेने चांगल्या सूचना मोकळेपणाने कराव्यात
शहरात शांतता राखून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, दाखल झालेल्या गुन्ह्याचा तात्काळ निपटारा करणे आणि शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यास प्राधान्य आहे. आपल्या कार्यालयाची दारे जनतेसाठी कायम उघडी असतील, असे स्पष्ट करीत जनतेने त्यांच्या कामासाठी चांगल्या सूचना मोकळेपणाने कराव्यात, असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले.
पाच वर्षांत औरंगाबाद औद्योगिक हब होईल -चिरंजीव प्रसाद
औरंगाबाद शहरातील जनता खूप चांगली आहे. यामुळे पाच वर्षांत औरंगाबाद औद्योगिक हब म्हणून ओळखले जाईल, अशी प्रतिक्रिया मावळते पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. येथील पोलीस उपायुक्त खाटमोडे यांनी पाहिजे असलेली आणि फरारी आरोपी शोधण्यासाठी उत्तम योजना विकसित केली.