घनसावंगीत सिंचन कामांना प्राधान्य
By Admin | Published: October 25, 2015 11:37 PM2015-10-25T23:37:50+5:302015-10-25T23:58:27+5:30
जालना : घनसावंगी विधानसभा मतदार संघात गत पंधरा वर्षांत सिंचनाची कुठलीही कामे न झाल्याने या भागात भीषण पाणी टंचाई आहे.
जालना : घनसावंगी विधानसभा मतदार संघात गत पंधरा वर्षांत सिंचनाची कुठलीही कामे न झाल्याने या भागात भीषण पाणी टंचाई आहे. म्हणूनच शिवसेनेच्या माध्यमातून आपण या मतदार संघात सिंचनाच्या कामाना प्राधान्य देणार असल्याची माहिती डॉ. हिकमतराव उढाण यांनी येथे रविवारी दिली.
डॉ. उढाण यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात विकास कामे तुलनेने कमीच झाली आहेत. आजही हे भाग मागासलेले राहिले आहेत. परिणामी सर्वच लोकांचा आर्थिक स्तर उंचावू शकला नाही. या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर घनसावंगी तालुक्यातील दहा गावांमध्ये सिंचनाची कामे करण्याचा निर्धार केला. त्यानुसार उढाण कंडारी येथे याची सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित गावांमध्ये लवकरच ही कामे सुरु केली जातील. सिंचनाअभावी विकास रखडला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून या भागात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत.
आघाडी सरकारने या भागाच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. गत पंधरा वर्षांत सत्तेत असूनही या भागातील लोकप्रतिनिधी विकासाच्या योजना या भागासाठी आणू शकले नाहीत. परिणामी हा भाग विकासापासून कोसोदूर राहिला आहे. मात्र, शिवसेनेच्या शिवजलक्रांती व इतर योजना राबविणार असून, आगामी काळात अधिक सक्रीय होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
गेल्या पंधरा वर्षांपासून आघाडी सरकारचे राज्य होते. परंतु अंबड आणि घनसावंगी विधानसभा मतदार संघात विकासाची कामे होऊ शकलेली नाहीत. परिणामी या भागातील ग्रामस्थ आजही विकासापासून कोसो दूर आहेत. आगामी काळात शिवसेनेच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. उढाण म्हणाले.