विद्यार्थी हित आणि नियमानुसार कामास प्राधान्य; नवनियुक्त प्रकुलगुरू तेजनकर यांनी स्पष्ट केली भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:07 PM2018-02-26T17:07:03+5:302018-02-26T17:18:50+5:30
पदभार स्विकारल्यानंतर डॉ. तेजनकर यांनी सर्वांशी संवाद साधला. विद्यार्थी हिताला सर्वांधिक प्राधान्य देणार असून, प्रत्येक काम नियमानुसार केले जाईल. विद्यापीठ कायदाचा भंग करून कोणतेही काम केले जाणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
औरंगाबाद : आपल्या पगारासाठी शासन पैसा देते. हा पैसा जनतेचा असतो. यामुळे प्राध्यापक, कर्मचार्यांनी या पैशाचा योग्य विनियोग होण्यासाठी नियमानुसार, कायद्यानुसार काम करणे अपेक्षित आहे. नियमानुसार काम करणारांच्या पाठिशी खंबिरपणे उभे राहिल. मात्र कपाळकरंटे काम करणार्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल,असा इशारा नवनियुक्त प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी पदभार स्विकारतेवेळी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या प्रकुलगुरूपदी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. अशोक तेजनकर यांची शुक्रवारी नियुक्ती केली. या पदाचा पदभार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते डॉ. तेजनकर यांनी घेतला. पदभार स्विकारण्याचा कार्यक्रम महात्मा फुले सभागृहात पार पडला. यावेळी विद्यापीठ, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिसभा सदस्य, प्राचार्य, अधिष्ठातांनी मनोगत व्यक्त केले.
पदभार स्विकारल्यानंतर डॉ. तेजनकर यांनी सर्वांशी संवाद साधला. विद्यार्थी हिताला सर्वांधिक प्राधान्य देणार असून, प्रत्येक काम नियमानुसार केले जाईल. विद्यापीठ कायदाचा भंग करून कोणतेही काम केले जाणार नाही. कर्मचारी, अधिका-यांनीही नियमानुसार काम केल्यास कोणतीही संघटना, नेता दबाव आणू शकत नाही. जर दबाव आणलाच तर त्याला विरोध करण्याचे धैर्य माझ्याकडे आहे. तरीही सर्व गट-तट बाजूला ठेवून महामानवाचे नाव असलेल्या विद्यापीठाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य सर्वांना सोबत करणार असल्याचेही डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी केला. यावेळी मंचावर कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय साळुंके, डॉ. मजहर फारूकी, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. वाल्मिक सरवदे यांनी केले. आभार डॉ. नंदकुमार राठी यांनी व्यक्त केले.
...आता तरी प्रभारी राज संपवा
विद्यापीठाचा मागील तीन-चार वर्षांपासून कारभार हा प्रभारींवर केला जात आहे. डॉ. अशोक तेजनकर यांच्या रूपाने प्रकुलगुरू पूर्णवेळ मिळाला आहे. आता तरी किमान हे प्रभारी संपवून विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या, अशी सुचना अधिसभा सदस्य प्रा. सुनिल मगरे यांनी यावेळी केली. तसेच डॉ. गजानन सानप, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. विक्रम खिलारे, डॉ.संजय साळुंके,डॉ. मजहर फारुकी, प्राचार्य उत्तम पांचाळ, डॉ. शंकर अंभोरे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त करत नवनियुक्त प्रकुलगुरूंना कामकाजात सहकार्य करण्याची ग्वाही दिली.