औरंगाबादेत हवालदाराला मारहाण करून कैदी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:41 AM2018-04-24T00:41:19+5:302018-04-24T00:43:25+5:30
लॉकअपमध्ये बंद असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांनी कर्तव्यावरील पोलीस हवालदाराकडे पाण्याची मागणी केली. हवालदाराने पाण्याची बाटली देण्यासाठी लॉकअप उघडले. दार उघडताच त्या कैद्यांनी हवालदाराला खाली पाडून बेदम मारहाण केली आणि त्यांनाच आत डांबून बाहेरून कडी लावून पलायन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लॉकअपमध्ये बंद असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांनी कर्तव्यावरील पोलीस हवालदाराकडे पाण्याची मागणी केली. हवालदाराने पाण्याची बाटली देण्यासाठी लॉकअप उघडले. दार उघडताच त्या कैद्यांनी हवालदाराला खाली पाडून बेदम मारहाण केली आणि त्यांनाच आत डांबून बाहेरून कडी लावून पलायन केले. हा प्रसंग एखाद्या सिनेमातील नव्हे, तर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये सोमवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडलेली सत्य घटना आहे. हवालदाराच्या आरडाओरडीमुळे रुग्णवाहिकेच्या चालक-मालकांनी पाठलाग करून एका आरोपीला पकडले.
सोनू दिलीप वाघमारे (२२, रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन उड्डाणपूल परिसर), असे पळून गेलेल्या आरोपीचे, तर अक्षय शाम आठवले (२०, रा. बीड), असे पळून जाताना पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. सोनू वाघमारे याला मोबाईल आणि दागिने लुटल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने आठ महिन्यांपूर्वी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली, तेव्हापासून तो हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. पाय दुखत असल्याच्या कारणावरून जेल प्रशासनाने सोनूला ३० मार्च रोजी घाटी रुग्णालयात दाखल केले. आरोपी अक्षय याच्याविरोधात बीड येथे विविध गुन्हे दाखल आहेत. दीड वर्षापूर्वी एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून त्याने वेटरवर गावठी पिस्टलमधून गोळीबार केला होता. वेटरने गोळी चुकविली होती, मात्र त्याच गोळीतील छर्रे अक्षयच्या छातीत घुसल्याने तो जखमी झाला होता. बीड पोलिसांनी अक्षयसह त्याच्या साथीदारांवर मोक्कांतर्गत गुन्हे नोंदविलेले आहेत. तेव्हापासून तो बीड जिल्हा कारागृहात कैद होता. त्याच्या पाठीत गाठ झाल्याने १९ एप्रिल रोजी बीड पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले. दोन्ही आरोपी वॉर्ड क्रमांक १० मधील एकाच बराकीत उपचार घेत होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाव
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलीस निरीक्षक राजर्षी आडे, राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र क त्तुल, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी घाटीत धाव घेतली. मारहाणीत जखमी झालेल्या जोशी यांना तातडीने घाटीत दाखल करण्यात आले. याप्रकरणी हवालदार जोशी यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलीस हवालदाराला मारहाण करून पळून जाताना जनतेच्या मदतीने पकडलेल्या अक्षय श्याम आठवले या आरोपीची रवानगी सोमवारी सायंकाळी हर्सूल कारागृहात करण्यात आली. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी त्याला कारागृहात नेऊन सोडले.
पोलीस उपायुक्तांकडून चौकशी- मिलिंद भारंबे
या घटनेविषयी बोलताना प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले की, या घटनेची सखोल चौकशी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर या घटनेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. वॉर्ड क्र मांक १० मध्ये उपचार घेणाºया कैद्यांना ते जेलमध्येच आहे असे वाटले पाहिजे. अशा प्रकारचे ते लॉकअप असणे आवश्यक आहे. कैद्यांना सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांपैकी एक जण चहा पिण्यासाठी गेला होता. पोलीस चहा पिण्यासाठी जाऊ शकतो; मात्र कैदी सुरक्षित आहे का, याची खात्री करणे त्याचे आद्यकर्तव्य आहे. तेव्हा एकच हवालदार तेथे असल्याची संधी साधून आरोपींनी त्यांना मारहाण करून पलायन केले.