जेलमध्ये वस्तू नेण्यास मनाई करणाऱ्या जेल रक्षकावर कैद्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 08:06 PM2021-08-09T20:06:21+5:302021-08-09T20:12:23+5:30
मनाई केल्याने त्याला त्या वस्तू जेलमध्ये नेता आल्या नव्हत्या. त्यावरून त्याचा पोतदार यांचा राग आला होता.
औरंगाबाद: कारागृहात अनावश्यक वस्तू नेण्यास मनाई करणाऱ्या जेल रक्षकावर कैद्याने सिमेंट गट्टूने हल्ला चढविल्याची घटना रविवारी (दि.८) सकाळी ११ वाजता हर्सूल मध्यवर्ती कारागृहात घडली. हर्सूल पोलीस ठाण्यात हल्लेखोर कैद्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. शेख जमीर शेख सलीम (रा.बायजीपुरा) असे या कैद्याचे नाव आहे.
आरोपी शेख जमीर याच्याविरोधात गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत खूनाचा गुन्हा नोंद आहे. न्यायालयाच्या आदेशाने गेल्या काही दिवसापासून तो हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या केसच्या सुनावणीसाठी पोलिसांनी काही दिवसापूर्वी त्याला न्यायालयात हजर केले होते. तारखेला हजर राहून जेलमध्ये परत आला तेव्हा त्याने सोबत काही वस्तू आणल्या होत्या. त्या दिवशी गोवर्धन श्रीधर पोतदार हे कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करीत होते. बाहेरून आणलेल्या वस्तू कारागृहात नेण्यास परवानगी नसल्याचे त्यांनी त्यास बजावले.
यानंतरही तो त्या वस्तू आतमध्ये नेण्यासाठी हट्ट करीत होता. पोतदार यांनी त्यास मनाई केल्याने त्याला त्या वस्तू जेलमध्ये नेता आल्या नव्हत्या. त्यावरून त्याचा पोतदार यांचा राग आला होता. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोतदार हे जेलमध्ये दैनंदिन काम करीत असताना आरोपी जमीरने त्यांना शिवीगाळ केली व तेथे पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून डोक्यावर मारला. पोतदार आणि अन्य पोलिसांनी त्यास पकडून हातातील गट्टू हिसकावून घेतला. जखमी पोतदार यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोतदार यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ तपास करीत आहेत.