फौजदाराच्या हाताला झटका देऊन कैद्याचे हातकडीसह घाटी रुग्णालयातून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:33 PM2021-05-04T12:33:19+5:302021-05-04T12:34:56+5:30
crime news in Aurangabad : एका आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून त्याने जेलमधील दुसऱ्या आरोपीस कपडे घेऊन बोलावले असल्याचे सांगितले.
औरंगाबाद : धारदार शस्त्राने वार करून लूटमार करणे, तसेच पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कुख्यात आरोपीने सहायक फौजदाराच्या हाताला झटका देऊन धूम ठोकल्याची घटना सोमवारी दुपारी घाटी रुग्णालयात घडली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.
शेख शकील शेख आरेफ (२५, रा. कासंबरी दर्गा परिसर, पडेगाव) असे पळून गेलेल्या न्यायाधिन कैद्याचे नाव आहे. शेख शकील याने २०१७ मध्ये साथीदारांसह छावणी परिसरात आणि पंचवटी चौकालगत चाकूने वार करून लूटमार केली होती. या प्रकरणात छावणी ठाण्यात दोन गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. या गुन्ह्यात गुन्हे शाखेचे पथक त्याला पकडण्यासाठी पडेगाव परिसरात गेले होते, तेव्हा त्याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला होता. याविषयी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी शकील याला न्यायालयाने जामीन मंजूर केला नव्हता. मानेजवळ आलेल्या गाठीवर उपचार करण्यासाठी सोमवारी त्याला पोलीस बंदोबस्तात घाटी रुग्णालयात आणले होते. सहायक फौजदार ए. एस. पवार आणि महिला हवालदार उज्ज्वला राठोड त्याच्यासोबत होत्या. आरोपी शकील यास हातकडी घालून आणि दोरखंड हातात पकडून पवार हे त्याला वॉर्डात घेऊन गेले. डॉक्टर आहेत का, हे पाहण्यासाठी राठोड आतमध्ये गेल्या. यावेळी गॅलरीत उभ्या असलेल्या शकीलने पवार यांची नजर चुकवून हातकडीचा दोर सोडला आणि त्यांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह धूम ठोकली. सहायक फौजदार पवार, राठोड यांनी त्याचा घाटी परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन
या घटनेनंतर सहायक फौजदार पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून आरोपी शकील पळून गेल्याचे कळविले. बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, गुन्हे शाखेचे स.पो.नि. जारवाल यांनी घाटीत धाव घेतली आणि शकीलचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तरी तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
दुसऱ्या आरोपीच्या भावाला केला कॉल
आरोपी शकीलसोबत घाटीत अनेक आरोपी आले होते. एका आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून त्याने जेलमधील दुसऱ्या आरोपीस कपडे घेऊन बोलावले असल्याचे सांगितले. त्या आरोपीचा भाऊ कपडे घेऊन घाटीत येईपर्यंत शकीलने धूम ठोकली होती.