पुन्हा गुन्हेगारीची निवड;चांगल्या वर्तवणूकीमुळे खुल्या कारागृहात ठेवलेला कैदी २३ दिवसांत पळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 07:51 PM2022-03-28T19:51:18+5:302022-03-28T19:52:30+5:30
पैठणच्या खुल्या कारागृहातून जन्म ठेप भोगणाऱ्या कैद्याचे पलायन
पैठण ( औरंगाबाद ) : मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद येथून २३ दिवसापूर्वी पैठण येथील खुल्या कारागृहात वर्ग झालेल्या कैद्याने रविवारी सायंकाळी कारागृह प्रशासनाची नजर चुकवून पलायन केले आहे. कारागृह प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून पलायन केलेल्या कैद्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कैद्याचा शोध घेण्यात येत आहे.
जन्म ठेपेची शिक्षा झालेला (कैदी क्र. सी ५३४८) अशोक दत्ताराव बोंगाणे (रा. परभणी) हा त्याचा बँरेक क्र ९ मध्ये सायंकाळी आढळून न आल्याने कारागृहातील शिपायांनी त्याचा परिसरात शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. सोमवारी कारागृहाचे शिपाई साहेबराव लक्ष्मण फुसे यांनी पैठण पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ज्या कैद्याची वर्तनूक चांगली असते अशा कैद्यांना शिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात पैठण येथील खुल्या कारागृहात हलविले जाते. येथील तुरूंगांना भिंती नसतात.
परभणी येथील कैदी अशोक बोंगाने यास २०१४ मध्ये परभणी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान त्याची वर्तणूक चांगली असल्याने त्यास पैठण येथील कारागृहात राहण्याची सवलत देण्यात आली होती. परंतु अवघ्या २३ दिवसात त्याने पैठण कारागृहातून धूम ठोकली. कारागृह प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ राजू आटोळे पुढील तपास करीत आहेत.