हर्सूल कारागृहात वॉर्डनकडून कैद्याला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:11 PM2018-12-01T13:11:49+5:302018-12-01T13:15:06+5:30
या मारहाणीनंतर कैद्याची प्रकृती बिघडताच त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
औरंगाबाद : खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला अन्य दोन कैद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना हर्सूल मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी रात्री घडली. या मारहाणीनंतर कैद्याची प्रकृती बिघडताच त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अविनाश शंकर पिंगळे आणि गणेश बागूल अशी मारहाण करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत, तर राजू भाऊसाहेब कुटे असे जखमी कैद्याचे नाव आहे. हर्सूल पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील राजू कुटे हा आरोपी आहे. तो हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे, तर राजूला ज्या बराकीमध्ये ठेवण्यात आले आहे त्या बराकीचा वॉर्डन म्हणून कैदी अविनाश पिंगळे हा काम पाहतो. त्याच बराकीमध्ये राजू सोबत गणेश बागूल हा कैदी राहतो.
गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बराकीतील फरशी स्वच्छ करण्याचा कपडा राजूने घेतला होता. हा कपडा कोण स्वच्छ करीन, असे म्हणून गणेशने राजूसोबत वाद घातला आणि त्यास मारहाण केली. त्यावेळी तेथे असलेल्या वॉर्डन अविनाशनेही गणेशची बाजू घेत राजूला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वादावादी होऊन गणेश आणि अविनाश यांनी राजूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अन्य कैद्यांनी आणि जेल रक्षकांनी मध्यस्थी करून अविनाश आणि गणेशच्या तावडीतून राजूची सुटका केली. त्यानंतर सुमारे चार ते पाच तासांनंतर राजूला पोट दुखण्याचा त्रास होऊ लागला.
याविषयी राजूने तक्रार करताच त्याला कारागृहातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी राजूवर प्रथमोपचार केले. त्यानंतर तासाभराने राजूने पुन्हा असह्य त्रास होत असल्याची तक्रार करताच कारागृह रक्षकांनी राजूला रात्री पावणेतीन वाजता घाटीत दाखल केले. राजूवर घाटीत उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोहेकॉ. दादाराव कोतकर यांनी कैदी राजू याचा जबाब नोंदवला.
कारागृह प्रशासनाने कळविले पोलिसांना
या घटनेविषयी बोलताना कारागृह अधीक्षक बी.आर. मोरे म्हणाले की, रात्री कैदी राजू आणि वॉर्डन पिंगळे यांच्यात हाणामारी झाली. पिंगळेने मारहाण केल्याची तक्रार राजूने करताच या घटनेची माहिती आम्ही हर्सूल पोलिसांना कळविली. राजूवर प्रथम कारागृहातील डॉक्टरांमार्फत उपचार करून नंतर घाटीत नेले.