कैदी पुढे पोलिस मागे; १० कि.मी. पाठलाग करून खुल्या कारागृहातील फरार कैद्याला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 12:59 PM2024-07-04T12:59:10+5:302024-07-04T12:59:23+5:30
पैठणच्या कारागृह अधीक्षकांच्या पथकाची कारवाई
पैठण : येथील खुल्या कारागृहातील एक कैदी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फरार झाला होता. मात्र, बुधवारी पहाटे त्याला जेरबंद करण्यात कारागृह अधीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. विजय ऊर्फ धनंजय श्रीकांत शिंदे (वय ४६, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे कैद्याचे नाव आहे.
येथील खुल्या कारागृहातील बॅरेक क्रमांक दोनमध्ये हा कैदी खून प्रकरणी मार्च महिन्यापासून शिक्षा भोगत होता. मात्र, २ जुलैला रात्री तो खुल्या कारागृहातून फरार झाला होता. दरम्यान, कारागृह अधीक्षक धनसिंग कवाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दहा किलोमीटर पाठलाग करून बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील घोटणजवळ सदर कैद्याला झडप मारून पकडले आहे. या पथकात प्रशांत घुले, सुभाष राबडे, पाराजी सोन्नर, संदीप बागुले, गणेश बनसोडे, अमोल माने यांचा समावेश होता. याप्रकरणी पैठण ठाण्यात कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या आदेशावरून या कैद्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.