पाल्यांचे चेहरे पाहताच बंदीजनांची दिवाळी झाली गोड; गळाभेटीनंतर अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 08:18 PM2018-11-14T20:18:38+5:302018-11-14T20:19:27+5:30
मुलांचे चेहरे पाहताच अनेक बंदीजनांच्या भावनांचा बांध फुटला. अनेकांनी आपल्या पाल्यांना गळ्याशी लावत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
औरंगाबाद : हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मंगळवारी आपल्या मुलाबाळांना भेटता आले. मुलांचे चेहरे पाहताच अनेक बंदीजनांच्या भावनांचा बांध फुटला. अनेकांनी आपल्या पाल्यांना गळ्याशी लावत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
कारागृहातील कैद्यांना आपल्या कुटुंबियांना भेटता यावे, त्यांच्यासमवेत काही वेळ घालविता यावा यासाठी शासन आणि कारागृह प्रशासनातर्फे दहा वर्षांपेक्षा जास्त किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांसाठी गळाभेट कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून दिवाळी झाल्यानंतर मंगळवारी हर्सूल कारागृहातील अनेक कैदी आपल्या मुुलाबाळांना भेटू शकले. त्यामुळे दिवाळीनंतर का होईना कैद्यांना दिवाळीचा आनंद घेता आला.
हर्सूल कारागृहात ९ डिसेंबर २०१६ पासून १३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत चार गळाभेट कार्यक्रम झाले. मुले भेटायला येणार या उत्सुकतेपोटी सर्वच कैद्यांनी मुलांसाठी खाऊ घेऊन ठेवला होता. या कार्यक्रमात ९० कैद्यांना कुटुंबियांची भेट घेता आली. तास-दोन तास मुलांसोबत घालविता आले. त्यांनी आणलेला दिवाळी फराळ मुलांना भरविताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पाच, सात, दहा वर्षांची मुले आणि मुलीही वडिलांना आपुलकीने घास भरवितानाचे चित्र दिसले. ज्यांना लहान मुले आहेत अशा कैद्यांनी मुलांना मांडीवर घेऊन घास भरवला. अनेक बंदीजन मुलांच्या शाळेतील प्रगतीची माहिती घेत होते. मुलेही आपल्या पालकांना शाळेतील व घरातील इतर गोष्टी सांगताना दिसले. कारागृहाचे अधीक्षक बी. आर. मोरे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला. कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.