प्रीतम मुंडेंनी मारली बाजी !
By Admin | Published: October 20, 2014 12:11 AM2014-10-20T00:11:41+5:302014-10-20T00:34:05+5:30
बीड : लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार डॉ़ प्रीतम मुंडे यांनी भरघोस मतांची आघाडी घेत विजय मिळविला़ १३ लाख मतांपैकी ९ लाख ३२ हजार इतकी विक्रमी मते मिळविली़
बीड : लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार डॉ़ प्रीतम मुंडे यांनी भरघोस मतांची आघाडी घेत विजय मिळविला़ १३ लाख मतांपैकी ९ लाख ३२ हजार इतकी विक्रमी मते मिळविली़ त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांना केवळ सव्वा दोन लाख मतांवर समाधान मानावे लागले़ केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची द्वितीय कन्या प्रीतम मुंडे यांना अनपेक्षितपणे राजकारणात यावे लागले़ मुंडे यांना श्रध्दांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच शिवसेनेने तेथे उमेदवार उभा केला नाही़ माजी मंत्री अशोक पाटील यांनी मात्र काँग्रेसकडून रणांगणात उडी घेत आव्हान दिले होते़ महिन्यापूर्वी राजकीय क्षेत्रात आलेल्या प्रीतम यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणे केली़ गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी संधी द्या, असे साकडे घालणाऱ्या प्रीतम यांच्यावर मतदारांनी मतांचा पाऊस पाडला़ जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना प्रचंड बहुमत मिळाले़ पहिल्या फेरीपासून त्या आघाडीवर होत्या़ ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी कायम ठेवली़ नरेंद्र मोदी यांची लाट व गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर डॉ़ प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत दणदणीत धडक मारली आहे़ त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला़ ठिकठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून अक्षरश: दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली़ (प्रतिनिधी)