ट्रॅव्हल्सचालक घेतात बेशिस्तपणे रस्त्याचा ताबा; या ठिकाणी रात्री ९ ते ११ न गेलेलेच बरे

By सुमित डोळे | Published: December 27, 2023 08:22 PM2023-12-27T20:22:53+5:302023-12-27T20:23:21+5:30

ट्रॅव्हल्स चालक, मालकांकडून वाहतूक नियमच पायदळी; सामान्यांना वाहन काढणेही होतेय अवघड

private buses occupy the road unruly; It is better not to visit this place between 9 and 11 pm | ट्रॅव्हल्सचालक घेतात बेशिस्तपणे रस्त्याचा ताबा; या ठिकाणी रात्री ९ ते ११ न गेलेलेच बरे

ट्रॅव्हल्सचालक घेतात बेशिस्तपणे रस्त्याचा ताबा; या ठिकाणी रात्री ९ ते ११ न गेलेलेच बरे

छत्रपती संभाजीनगर : शहरातून रोज हजारो प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने विविध शहर, राज्यांमध्ये ये-जा करतात. परंतु याच ट्रॅव्हल्स चालकांकडून अनेकदा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जातात. बस सुसाट पळवणे, वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळण्यासोबतच शहरवासीयांना त्यांच्यामुळे रोज वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात प्रवेशाच्या विहित वेळेआधीच रस्त्यावर उतरत अनेक ट्रॅव्हल्स रस्ते, चौकांमध्ये गर्दी करतात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघातांनाही निमंत्रण दिले जात आहे.

या ठिकाणी रात्री ९ ते ११ न गेलेलेच बरे
बाबा पेट्रोल पंप : बाबा पेट्रोल पंप चौकात छावणीच्या दिशेने नागपूरकडून जाणाऱ्या बस रस्त्यावरच उभ्या राहतात. एकाच वेळी दोन बस उभ्या राहताच अन्य वाहनांना जाणेही मुश्कील होते.
शहानूरमियाँ दर्गा : पोलिसांकडून ट्रॅव्हल्स चालकांसाठी शहानूरमिया दर्गा येथील थांबा ठरवून देण्यात आला आहे. मात्र, तरीही अनेक चालकांनी बस रस्त्यावरच उभे केल्याचे आढळून आले.
रामगिरी ते सिडको : रामगिरी, वसंतराव नाईक महाविद्यालय ते सिडको चौकात मात्र अतिशय भयावह चित्र अनुभवायला मिळते. साडेआठ वाजेपासून जवळपास ८ ते १० ट्रॅव्हल्स एकाच वेळी रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. परिणामी, प्रवाशांना सोडायला आलेली कुटुंबांची वाहने तेथेच आल्याने संपूर्ण वाहतुकीचा खोळंबा होतो.

लांबपर्यंत रांगा, अचानक घेतात वळण
-या ट्रॅव्हल्सच्या लांब लांब रांगा, एकाच वेळी दोन ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जातात.
-शहरातही सुसाट वेगात जात अचानक वळण घेतात. मोठ्या आकाराची असल्याने अनेकदा छोट्या वाहनांच्या अपघाताची भीती निर्माण होते.
-प्रवासी बसेपर्यंत जवळपास एक बस किमान २० मिनिटे उभी राहते. सोमवारी रात्री सिडको चौकात जवळपास १० बस ट्रॅव्हल्सचालकांनी रस्त्याचा ताबा घेतला होता.

असे चालणार नाही, कठोर कारवाई होईल
ट्रॅव्हल्स चालकांना विहित नियम व जागा ठरवून दिल्या आहेत. तरीही चालक ते पाळत नसतील, तर कठोर कारवाई केली जाईल. लवकरच ट्रॅव्हल्स चालक, मालकांची बैठक घेऊन सूचना केल्या जातील.
- शीलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त.

Web Title: private buses occupy the road unruly; It is better not to visit this place between 9 and 11 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.