हवा तो अहवाल दिला जात असल्याने खासगी लॅबना कोरोना तपासणीवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 06:20 PM2021-03-24T18:20:36+5:302021-03-24T18:22:23+5:30
खासगी लॅबमध्येही कोरोना चाचण्यांसाठी जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.
औरंगाबाद : खासगी लॅबमधून नागरिकांना पाहिजे तसा अहवाल दिला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच तपासणीसाठी मनमानी दर वसूल केले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे महापालिकेने खासगी लॅबचालकांना कोरोना तपासणी करण्यास बंदी घातली आहे.
मागील वर्षी रुग्णांचे स्रावांचे नमुने घेण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे खासगी लॅबना कोरोना तपासणीची मुभा दिली होती. शहरात मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. वर्षभरानंतर पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली. रोज नव्याने एक हजार रुग्ण आढळत आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना तपासण्या करण्यासाठी पालिकेने पथके नेमली आहेत. खासगी लॅबमध्येही कोरोना चाचण्यांसाठी जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. शहरात दोन ठिकाणी खासगी लॅब आहेत. यांतील एक लॅब समर्थनगरात तर दुसरी सूतगिरणीच्या परिसरात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या खासगी लॅबमधून नागरिकांना पाहिजे तसा अहवाल दिला जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी नागरिकांकडून अधिकचे शुल्कही वसूल केले जात आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेऊन खासगी लॅबला कोरोना चाचणी करण्यास बंदी आदेश मंगळवारी जारी केला. यापुढे रुग्णांच्या घरी जाऊन स्राव घेऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. संशयित रुग्णांनी पालिकेच्या केंद्रात जाऊनच चाचणी करावी, असे आवाहनही केले आहे.
खासगीत २७ हजार तपासण्या
महापालिकेकडून प्राप्त अहवालानुसार सोमवारी (दि. २२) शहरात या दोन्ही खासगी लॅबमधून तब्बल ५८८ नागरिकांनी कोरोना चाचणी केली. वर्षभरात खासगी लॅबमधून २७ हजार ३३० तपासण्या करण्यात आल्या. त्यांपैकी ३ हजार ७०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत; तर २३ हजार ६२६ तपासण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.