कोट्यवधींच्या रस्त्यांवर खासगी पार्किंग; यंत्रणा गप्पगार, हजारो नागरिकांना विनाकारण त्रास
By मुजीब देवणीकर | Published: October 13, 2022 02:10 PM2022-10-13T14:10:31+5:302022-10-13T14:11:44+5:30
वाहतूक पोलीस, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात आले. या रस्त्यांचा वापर काही वाहनधारक खासगी पार्किंगसाठी करीत आहेत. त्यामुळे लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ‘लोकमत’ने शहरातील काही रस्त्यांची पाहणी केली असता अत्यंत विदारक चित्र समोर आले.
शहराची वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणा जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. रिक्षाचालक पोलिसांच्या डोळ्यासमोर रस्त्यांवर, चौकाचौकांत थांबून प्रवासी बसवितात. त्यामुळे वाहतूक खोळंबते; परंतु पोलीस त्याकडे कानाडोळा करतात. अतिक्रमण आणि फेरीवाल्यांवर मनपा पाच, सहा महिन्यांमधून एखाद्या वेळी कारवाई करताना दिसते.
रस्त्यांवर वाहने उभे करण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. आधी रस्त्याच्या डाव्या बाजूला चारचाकी वाहनांची एक रांग दिसत होती, आता चक्क दोन दोन रांगा दिसू लागल्या आहेत. मग वाहनधारकांना वापरण्यासाठी किती रस्ता शिल्लक राहील?
कोणत्या रस्त्यांवर समस्या गंभीर ?
-सेव्हन हिल ते टीव्ही सेंटर हा रस्ता जवळपास ११ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला. या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनांची पार्किंग करण्यात येते.
-चिश्तिया चौक ते एन-६ स्मशानभूमीवर रोडवर एकाच बाजूला वाहनांची २४ तास पार्किंग पाहायला मिळते.
-चिश्तिया चौक ते एन-१ या रस्त्यावर फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे.
-गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांसमोर पार्किंग सुरू आहे.
- रोशन गेट ते आझाद चौक या पाच कोटींच्या रस्त्यावर दुभाजकाला लागून दोन्ही बाजूने २४ तास पार्किंग केलेली वाहने असतात.
- गजानन महाराज मंदिर ते जय भवानी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड अतिक्रमणे, वाहनांची पार्किंग दिसून येते.
- महावीर चौक ते पंचवटी चौकादरम्यान हातगाड्या व त्यासमोर रिक्षा उभ्या राहत असल्याने येथेही वाहतूक जाम होत असते.
दिवाळीत समस्या अधिक गंभीर बनते
दिवाळीच्या खरेदीनिमित्त शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणारे नागरिक बाजारपेठेत येतात. तेथे पार्किंगसाठी जागा नाही. नाइलाजास्तव नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
मनपा भंगार वाहने उचलते
अतिक्रमणे काढणे, रस्त्यावरील भंगार वाहने उचलण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. यापूर्वी दोन वेळेस लाखो रुपये खर्च करून जवळपास ४०० पेक्षा अधिक वाहने मनपाने थेट जप्त केली होती. कारवाई केली तरी दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी फेरीवाले विक्री करतात.
- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा
जागेवरच दंड आकारणी होते
शहर वाहतूक पोलीस नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना नियमानुसार दंड आकारत आहेत. वाहतूक पोलिसांकडे वाहन ‘टो’ करून नेण्यासाठी एकच वाहन आहे. संबंधित वाहनधारकाला जागेवरच दंड आकारतो.
- कैलास देशमाने, पोलीस निरीक्षक, वाहतूक