खाजगीकडे ३८ हजार लसींचा साठा; महापालिकेकडे ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:17+5:302021-07-21T04:04:17+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहायचे असेल तर लसीचे दोन डोस घ्या, असे आवाहन शासनाकडून वारंवार करण्यात येत ...
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहायचे असेल तर लसीचे दोन डोस घ्या, असे आवाहन शासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र औरंगाबाद शहरात लसीचा ठणठणाट असून, सलग पाचव्या दिवशीही लसीकरण होणार नाही. बुधवारी महापालिकेला साठा प्राप्त झालाच तर गुरुवारी लसीकरण शक्य आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांकडे मात्र ३८ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे.
दरम्यान, दुसऱ्या डोससाठी वेटिंगवर असलेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ७२ हजारांपर्यंत पोहोचला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे अनेकांना वेटिंगवरच राहावे लागणार आहे.
शुक्रवारी शहरातील ३९ लसीकरण केंद्रांवर ६ हजार डोस देण्यात आले होते. ९० टक्के नागरिकांना दुसरा तर १० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला होता. शनिवारपासून महापालिकेकडे लसच शिल्लक नाही. सोमवारी, मंगळवारी मनपाच्या आरोग्य विभागाने लस मिळावी म्हणून प्रयत्न केले. पण, शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. लसीचा साठा आणण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा वाहन पुण्याला रवाना झाले. बुधवारी दुपारपर्यंत शहर आणि ग्रामीण भागाला साठा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. लस नसल्याने नागरिकांना शहरात एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर अक्षरश: भटकंती करावी लागत आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी लस नाही, असे बोर्ड लावण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातही तुटवडा
ग्रामीण भागातही लसींचा तुटवडा आहे. जिल्हा लसीकरण केंद्र रिकामे पडले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयांमध्ये फक्त दीड हजार कोविशिल्ड लसीचे डोस शिल्लक आहेत. प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन व्हायलच उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बुधवारी व्यापक प्रमाणात लसीकरण अशक्य आहे. सध्या लसीचा तुटवडा असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. रेखा भंडारे यांनी सांगितले.
------
आज लसींचा साठा मिळेल
लस आणण्यासाठी आरोग्य विभागाचे वाहन रवाना झाले आहे. बुधवारी लसींचा पुरवठा होणार आहे. या वेळी मोठे वाहन पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात लस मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून जेवढा पुरवठा होतो, तेवढ्याच जिल्ह्याला लसी मिळतात.
- डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक
लसीकरणाची स्थिती
भाग-पहिला डोस - दुसरा डोस - टक्केवारी (दोन्ही डोस)
शहर - ३,८४,९५९ - १,४२,३३३ - १२.०९
ग्रामीण - ३,८८,५२५ - १,१२,५६१ - ५.३३