विद्यापीठातील खेळाची मैदाने, जलतरण तलावाचे होणार खाजगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 07:33 PM2020-03-07T19:33:35+5:302020-03-07T19:35:11+5:30
विद्यापीठाने मैदानांच्या खाजगीकरणाच्या घेतलेल्या निर्णयाला विविध राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, अॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांच्या मैदानाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या मैदानाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
विद्यापीठाने मैदानांच्या खाजगीकरणाच्या घेतलेल्या निर्णयाला विविध राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. अधिसभा सदस्य अॅड. विजय सुबुकडे पाटील यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन देत खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रभारी कुलसचिवांनी काढलेल्या परिपत्रकानुसार १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठातील स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, अॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांच्या मैदानाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खाजगीकरणाची प्रक्रिया राबविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे आहेत. समितीच्या सदस्य सचिव म्हणून क्रीडा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. कल्पना झरीकर यांची निवड केली आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सुनील निकम, शिवाजी महाविद्यालय कन्नडचे डॉ. उदय डोंगरे, तेरणा महाविद्यालय उस्माबानादचे डॉ. चंद्रजित जाधव, स.भु.चे डॉ. दयानंद कांबळे, महापालिकेच्या जलतरण तलावाचे डॉ. अभय देशमुख यांची समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे. ही समितीची खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. याला विद्यार्थी संघटनांनी प्रखर विरोध नोंदवला असून, निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठाने कोट्यवधी रुपये खर्च करून मैदाने तयार केली असून, ही मैदाने खाजगी व्यक्तींच्या ताब्यात देण्यास हा विरोध दर्शविण्यात येत आहे.
शारीरिक शिक्षण विभागात नियमित तासिका घ्या
विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात नियमित तासिका घेण्यात येत नाहीत. त्याठिकाणी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीची नोंदही केली जात नसल्याचा आरोप अॅड. सुबुकडे यांनी निवेदनात केला आहे. याशिवाय शारीरिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात येत आहेत. खेळाडूंना स्पर्धेत पाठविण्यापासून प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी लॉबिंगसह आर्थिक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे विद्यमान क्रीडा संचालकांनी पदावरून काढण्याची मागणीही करण्यात आली आहे. याविषयी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.