औरंगाबादेतील कचरा संकलनाचे खासगीकरण ; २११ कोटींचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:50 PM2018-10-22T21:50:19+5:302018-10-22T21:51:02+5:30
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक नागरिकाकडून कचरा जमा करणे, हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेऊन टाकणे या कामासाठी सोमवारी स्थायी समितीने ...
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक नागरिकाकडून कचरा जमा करणे, हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेऊन टाकणे या कामासाठी सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. २११ कोटी रुपयांचा हा प्रकल्प ७ वर्षे राबविण्यात येणार आहे. बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला काम देण्यात आले आहे. मागील एक महिन्यापासून स्थायी समितीमध्ये हा विषय रेंगाळला होता. जडअंत:करणाने समिती सदस्यांनी सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. एक मेट्रिक टन कचरा कंपनीने कचरा प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकल्यास मनपा १८६३ रुपये कंपनीला देणार आहे. दररोज ८ लाख ३८ हजार रुपये, महिना २ कोटी ५१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. कंपनीला वर्कआॅर्डर लवकरच देण्यात येणार आहे. कंपनीचे काम सुरू होताच नागरिकांना दररोज एक रुपया उपभोक्ता कर द्यावा लागेल. व्यापाऱ्यांना दररोज २ रुपये कर द्यावा लागेल. ही रक्कम मनपा जमा करणार किंवा कंपनी हे अद्याप निश्चित झालेले नाही. कंपनीला रिक्षा, टिप्पर, हुकलोडर, कॉम्पॅक्टर आदी सर्व यंत्रसामग्री नवीन आणि स्वत:च्या नावावर असलेली आणावी लागेल. भाड्याने जुनी यंत्रसामगी अजिबात चालणार नाही, अशी अटही टाकण्यात आली आहे.
सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर नगरसेविका राखी देसरडा यांनी विशिष्ट कंपनीला काम मिळावे म्हणून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सभापतींनी या मागणीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सर्व सदस्यांची नाराजी यापूर्वीच दूर करण्यात आली होती. जडअंत:करणाने सदस्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
१३०० मजूर सफाईसाठी
घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी खुलासा करताना सांगितले की, कचरा संकलन व वाहतुकीचे काम पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिल्यानंतर मनपाच्या आस्थापनेवरील १२९५ सफाई मजुरांना स्वच्छतेची कामे देण्यात येणार आहेत. सध्या भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली खासगी वाहने, कंत्राटी मनुष्यबळ यांना कामावरून काढून टाकले जाईल, असे त्यांनी नमूद केले. आज बचत गटांचे ६८०, तर कंत्राटी २०० कर्मचारी कचºयाच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. २५६ वाहने भाडेतत्त्वावर सुरू आहेत.