झालर क्षेत्र विकास आराखडा रखडण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 08:14 PM2019-07-30T20:14:05+5:302019-07-30T20:15:37+5:30

सुनावणी होऊन ७ महिने उलटले तरीही निर्णय होत नसल्याची ओरड

Probability of placing silt area development plan | झालर क्षेत्र विकास आराखडा रखडण्याची शक्यता 

झालर क्षेत्र विकास आराखडा रखडण्याची शक्यता 

googlenewsNext
ठळक मुद्देसिडकोने एकतर्फी झालर सोडलेसुविधा नसतानाही टोलेजंग बांधकामे ‘झालर’ मध्ये होत आहेत. 

औरंगाबाद : सिडकोने २६ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून तयार केलेला झालर क्षेत्र विकास आराखड्यावर मंत्रालयात धूळ साचली आहे. १५ जुलैपूर्वी पुणे नगररचना संचालक कार्यालयाकडून आराखड्याबाबत अंतिम प्रक्रिया पार पडणे गरजेचे होते. आता विधानसभा निवडणुकीनंतरच आराखड्याबाबत विचार होईल, अशी शक्यता आहे. शासनाने २०१७ मध्ये आराखडा मंजुरीची अधिसूचना काढली. परंतु १८९ आरक्षण बदलांमुळे नकाशांना मान्यता दिली नाही. १८९ आरक्षण बदलांबाबत सुनावणीचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्याची अधिसूचना निघाल्यानंतर अंतिम नकाशे मंजूर होतील, त्यानंतर झालरचा तिढा कायमस्वरुपी संपेल, अशी शक्यता सिडको नगररचना विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली.

३० नोव्हेंबर २००८ पासून आजपर्यंत ११ वर्षांचा कालखंड झालर क्षेत्र विकास आराखड्यासाठी गेला असून, या काळात त्या परिसरात ‘शून्य विकास’ झालेला आहे. बांधकाम परवानगीमधून सिडकोने अंदाजे ४१ कोटी रुपये आजवर घेतले असून, ते झालरच्या नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यात पडून आहेत. अंतिम मंजुरी आणि नियोजन प्राधिकरण म्हणून कुणाला नेमायचे याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत विकास शुल्कापोटी आलेली रक्कम सिडकोला खर्च करण्याचा अधिकार नाही. परिणामी रस्ता, पाणी, मलनिस्सारण सुविधा नसतानाही टोलेजंग बांधकामे ‘झालर’ मध्ये होत आहेत. 

सूत्रांनी सांगितले, ९७ टक्के आराखडा मागेच मंजूर झाला आहे. काही आरक्षणे व झोनबाबत निर्णय होणे बाकी आहे. ३ टक्के आराखड्यासाठी नगररचना सहसंचालकांकडे डिसेंबर २०१८ मध्ये सुनावणी झाली. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत आता मंत्रालयातून अधिसूचना निघेल. १८९ आरक्षणाच्या नोंदीनुसार नकाशे बदलतील. ईपी (एक्सक्लुटेड प्लॅन) जानेवारी २०१९ पर्यंत बनविण्याची डेडलाईन होती. अद्याप शासनाकडून काहीही निर्णय झालेला नाही. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान सिडकोला बांधकाम परवानगी देणे बंधनकारक आहे. 


सिडकोने एकतर्फी झालर सोडले
सिडकोने एकतर्फी झालर क्षेत्र विकास आराखड्यात काम न करण्याचा निर्णय एकतर्फी घेतला आहे. शासनाने त्यावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. सिडकोने आराखडा बनविला याचा अर्थ सिडकोनेच अंतिम विकास करावा, असा होत नाही. सध्या बांधकाम परवानगीतून मिळणारा निधी सिडको बँकेत जमा करीत आहे. इमर्जन्सी एजन्सी म्हणून सिडको झालरमध्ये बांधकाम परवानग्या देत आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

सगळे काही स्वप्नवत

११ वर्षांत झालर क्षेत्र विकास आराखड्यावरून सिडको वादातच राहिले. ३ लाख नागरिकांच्या सेवा-सुविधांसाठी १५ हजार हेक्टर जमिनीचे आरक्षणासह नियोजन करण्यासाठी सिडकोने काम सुरू  केले. २०२० पर्यंत आराखड्याचे लाभ नागरिकांना मिळतील, अशी स्वप्ने त्यावेळी दाखविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही होताना दिसत नाही. मुंबई, पुण्याचे विकास आराखडे मंजूर होऊन त्यानुसार कामे सुरू झाली. झालरचा आराखडा मात्र तसाच लटकलेला आहे. या आराखड्यातून काय होणार, झालर क्षेत्र कसे असेल, याचे कुठलेही सादरीकरण आजवर सिडकोने समोर आणलेले नाही.

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष
फुलंब्री मतदारसंघातील बहुतांश भाग झालर क्षेत्र विकास आराखड्यात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाठपुरावा करून आराखडा मंजूर करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी लक्ष न दिल्याचा आरोप होतो आहे. बागडे  म्हणाले की, आराखडा पुणे कार्यालयाने पुढे पाठविल्याचे कळते. माझ्याच मतदारसंघात जास्तीचा भाग असल्यामुळे आजपर्यंत आराखड्याचे काम पुढे नेले. पुढे काय झाले आहे, ते पाहतो. 

सिडको प्रशासकांचे मत असे....
सिडको प्रशासक पंजाबराव चव्हाण म्हणाले, याप्रकरणी नगररचना विभागाचे अधिकारी पाठपुरावा करीत आहेत. पुणे कार्यालयातून काही अपडेट अजून मिळालेले नाहीत. सद्य:स्थितीत काय सुरू आहे, याची माहिती घ्यावी लागेल. 

Web Title: Probability of placing silt area development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.