विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या गंभीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 07:19 PM2018-11-21T19:19:17+5:302018-11-21T19:25:36+5:30

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे.

The problem of students in the university's hostels will be critical | विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या गंभीर होणार

विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या गंभीर होणार

googlenewsNext

औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन, पदवीधरचे आमदार, अधिसभा सदस्यांचे पाहणी दौरे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची समिती नेमूनही विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जात नाही. दिवाळीनंतर गावाकडून विद्यार्थी विद्यापीठात दाखल होत असून, येत्या काही दिवसांत वसतिगृहांतील समस्यांचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली.

विद्यापीठातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत असल्याने तीन महिन्यांपासून अनेक वेळा विद्यार्थ्यांनी मध्यरात्री कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर आंदोलने केली. याविषयी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही याबाबत चर्चा करण्यात आली. यानुसार डॉ.राजेश करपे, डॉ. शंकर अंभोरे आणि डॉ. फुलचंद सलामपुरे यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये विद्यार्थिनींच्या वसतिगृहांतील समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्या डॉ. योगिता होके पाटील यांची नियुक्ती केली. डॉ. होके पाटील यांनी मुलींच्या वसतिगृहातील समस्यांचा एक शोधनिबंधच तयार करून प्रशासनाला दिला आहे.

या समितीची एक बैठक झाली. त्यानंतर काहीही झालेले नसल्याचे वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दिवाळीपूर्वी पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनीही वसतिगृहांना भेटी देऊन त्यात सुधारणा करण्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने दिवाळीच्या सुट्यांमध्ये वसतिगृहांतील समस्या सोडविण्यात येणार असल्याचेही सांगितले. मात्र दिवाळीच्या सुटीत कोणत्याही समस्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. आगामी महिन्यात ‘नॅक’ होणार असल्यामुळे कुलगुरू  डॉ. बी. ए. चोपडे यांनी वसतिगृहांसह विभागांमधील समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. तरीही वसतिगृहांतील समस्या सोडविण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

‘एसएफआय’ चे निवेदन
एसएफआय विद्यार्थी संघटनेतर्फे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची भेट घेऊन वसतिगृह क्रमांक-१मधील सुरू असलेल्या डागडुजीचे काम लवकर करण्याची मागणी केली. तसेच ठेकेदाराच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचेही प्रकुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सत्यजित म्हस्के, स्टॅलिन आडे आदी उपस्थित होते.

या समस्या सोडविण्याची मागणी
- वसतिगृहांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याबरोबर नियमित पाणी वेळेवर मिळावे. स्वच्छता राखावी.
-  वसतिगृह परिसरात विजेचे दिवे पुरेसे नाहीत. या अंधारामुळे सरपटणारे प्राणी वसतिगृहांत येतात. त्याचा बंदोबस्त करावा.
- मुलींच्या वसतिगृहांच्या मुख्य तीन प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षक, विजेचा बल्ब आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
- मुलींच्या वसतिगृहांची नियमित साफसफाई ही योग्य साधनांमार्फत व्हावी. वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात पुरविण्यात येणाऱ्या सेवा बंद झालेल्या असून, त्या पूर्ववत सुरू कराव्यात.
- जबाबदार अशा महिला वसतिगृह प्रमुखांची नेमणूक करावी. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या होण्यासाठी डस्टबीनची व्यवस्था करावी.

पाहणी करावी लागेल 
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. वरिष्ठांनी आदेश दिले तरी अंमलबजावणी करणारे अधिकारी, कर्मचारी काम करतात की नाही, हे पाहणे गरजेचे आहे.
- डॉ. योगिता होके पाटील, सदस्य, अधिसभा व वसतिगृह समस्या निवारण समिती

कामे सुरु आहेत 
विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. काही वसतिगृहांतील कामे सुरू झाली आहेत. उर्वरित कामेही तात्काळ सुरू करण्यात येतील.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

Web Title: The problem of students in the university's hostels will be critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.