विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न

By राम शिनगारे | Published: January 24, 2024 04:04 PM2024-01-24T16:04:27+5:302024-01-24T16:05:17+5:30

मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

Problems in the girls hostel in the BAMU university, Adhi Sabha member shows, the rush of the officials and the efforts to repair it | विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न

विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थिनींकडून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर पदवीधरच्या अधिसभा सदस्याने विद्यार्थी कल्याण संचालकांसह इतर अधिकाऱ्यांना वसतिगृहात पाहणीसाठी मंगळवारी बोलावून घेतले. तेव्हा धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात वर्षभरापासून दुरुस्ती अभावी गार पाण्याने विद्यार्थ्यांना स्नान करावे लागत असल्याचे महिनाभरापूर्वी उघडकीस आले हाेते. तेव्हाच कुलगुरूंनी मालमत्ता विभागाची बैठक घेत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. मुलांना गरम पाणी तत्काळ सुरू करण्यात आले. त्यावेळी अधिसभा सदस्य प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी यांनी पुढाकार घेतला होता. विद्यापीठात मुलींची पाच वसतिगृहे आहेत. त्यात अनेक समस्या असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी प्रा. सोमवंशी यांच्याकडे केल्या. त्यानुसार प्रा. सोमवंशी यांनी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना वसतिगृहात बोलावून घेतले.

तेव्हा रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात स्नानासाठी गरम पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही, लाइट, फॅन नादुरुस्त आढळले, सगळीकडे अस्वच्छता होती, स्वच्छतागृहाचा नळ बंद आढळला, वसतिगृहाच्या समोरचा हेडलाइट बंद होता. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नव्हती. यशवंत मुलींच्या वसतिगृहात इंटरनेट स्विचला वीजपुरवठा नाही, सर्व संगणक धूळखात पडून, नादुरुस्त झालेले दिसले, दरवाजे तुटले, सोलारचे ट्यूब लाइट बंद, नळ बंद, पाणी वापरण्याची टाकी फुटलेली होती, पिण्याच्या पाण्याचे वॉटर कुलरला हात लावल्यास विजेचा धक्का बसत होता. प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात सगळीकडेच अस्वच्छता, सॅनिटरी पॅडची मशीन बंद, नळ खराब झालेले होते, मुख्य टाकीमध्ये पाणीच नाही, मागच्या बाजूची लाइट बंद, महानगरपालिकेची घंटागाडी येत नसल्यामुळे सगळीकडे कचऱ्याचे ढीग आढळून आले. या पाहणीनंतर विद्यार्थी कल्याण संचालकांनी दुरूस्ती करण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना सुविधा पुरवाव्यात
विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या पाहिजेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन देत आहेत. तरी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
- प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमवंशी, अधिसभा सदस्य, पदवीधर

Web Title: Problems in the girls hostel in the BAMU university, Adhi Sabha member shows, the rush of the officials and the efforts to repair it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.