न्यायप्रविष्ठ प्रकरणाच्या निर्णयानंतर कार्यवाही करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:04 AM2021-01-25T04:04:21+5:302021-01-25T04:04:21+5:30
औरंगाबाद : भगवान महावीर प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका आणि येथील शिक्षकांचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना फेरतपासणी करून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी ...
औरंगाबाद : भगवान महावीर प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका आणि येथील शिक्षकांचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना फेरतपासणी करून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी शिक्षिकेचे वेतन काढण्याचा आदेश दिला होता. हे योग्य आहे का, याची पडताळणी करून याप्रकरणी न्यायप्रविष्ठ प्रकरणाच्या निर्णयानंतर कार्यवाही करावी, असा आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांना प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी दिला आहे.
या प्रकरणाला लोकमतने वाचा फोडली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे न्यायप्रविष्ठ प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी आदेश काढला होता. या प्रकरणात शिक्षण उपसंचालकांनी संस्थेचे म्हणणे विचारात न घेता सुनावणी घेतल्याचा आक्षेप घेतला होता. तरीही हे प्रकरण रेटून नेण्याचा प्रयत्न होता. याविषयी राजमाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष यांनी पंचायत राज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्याकडे दाद मागितली. रायमुलकर यांनी या न्यायप्रविष्ठ प्रकरणातील दिलेल्या आदेशाबद्दल शिक्षण संचालकांकडे योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार शिक्षण संचालक जगताप यांनी उपसंचालकांना न्यायप्रविष्ठप्रकरणी निर्णय होईपर्यंत कारवाई करू नका, असा लेखी आदेश दिला, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश योग्य आहे का, त्याचीही पडताळणी करण्याचे उपसंचालकांना कळवले आहे.