योद्धा असूनही लढण्याऐवजी घरी पाठविण्याची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:02 AM2021-07-09T04:02:16+5:302021-07-09T04:02:16+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : सीमेवर युद्धजन्य परिस्थिती नाही, म्हणून सैन्याला घरी पाठविले जात नाही. कोरोना महामारीचा मुकाबला करणाऱ्या डाॅक्टरांनाही ...

The process of being sent home instead of fighting despite being a warrior | योद्धा असूनही लढण्याऐवजी घरी पाठविण्याची प्रक्रिया

योद्धा असूनही लढण्याऐवजी घरी पाठविण्याची प्रक्रिया

googlenewsNext

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : सीमेवर युद्धजन्य परिस्थिती नाही, म्हणून सैन्याला घरी पाठविले जात नाही. कोरोना महामारीचा मुकाबला करणाऱ्या डाॅक्टरांनाही कोरोनायोद्धा म्हटले. पण कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला की लगेच कंत्राटी डाॅक्टरांना घरी पाठविले जाते. तीन-तीन महिने वेतन थकते. नोकरी टिकण्याची शाश्वती नसल्याने पुढे काय करणार, ही चिंता सतत सतावत असल्याचे शहरातील कंत्राटी डाॅक्टरांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गतवर्षी घाटी, मनपा आणि आरोग्य विभागाने कंत्राटी डाॅक्टर नेमले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच त्यांना कमी करण्यात आले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाटेत कंत्राटी डाॅक्टर घेण्यात आले. चार महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा या डाॅक्टरांना कमी करण्याचा धडाका सुरू झाला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे कंत्राटी डाॅक्टरांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे. कोणाला कमी करणार, आपली नोकरी राहणार की जाणार, मग पुढे काय करायचे, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

चौकट...

तीन महिन्यांपासून वेतनाविना

कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक कंत्राटी डाॅक्टरांना लसीकरणाची जबाबदारी दिली आहे. या सगळ्यात तीन महिन्यांपासून वेतनही थकले आहे. शासकीय यंत्रणेकडून आज ना उद्या वेतन होईल; परंतु नोकरी संपुष्टात आल्यानंतर खासगी रुग्णालयात पुन्हा नोकरी मिळेल का, अशी चिंता असल्याचे एका कंत्राटी डाॅक्टराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चौकट...

किमान ११ महिन्यांची ऑर्डर हवी

कंत्राटी डाॅक्टरांना ३-३ महिन्यांसाठी घेतले जाते. कंत्राटी डाॅक्टरांना पर्मनंट घ्यावे, अशी मागणी नाही. परंतु किमान ११ महिन्यांची ऑर्डर दिली पाहिजे. कंत्राटी डाॅक्टरांचे वेतन वेळेवर होत नाही. रुग्ण कमी होताच काढून टाकले जाते. कोरोना हा पुढेही राहणार आहे. त्यामुळे कोविड रुग्णालये उभे करून कंत्राटी डाॅक्टरांचे समायोजन केले पाहिजे. कंत्राटी डाॅक्टरांना मुदत वाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

- डाॅ. सीताराम जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ कोविड-१९ काॅन्ट्रॅक्चुअल डाॅक्टर्स

Web Title: The process of being sent home instead of fighting despite being a warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.