२ वर्षांपासून ‘पीएसआय’ परीक्षेची प्रक्रिया अपूर्ण;१५०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 04:48 PM2020-03-06T16:48:15+5:302020-03-06T16:50:49+5:30
महापरीक्षा पोर्टल बंदमुळे परीक्षाही थांबल्या
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या परीक्षेची पूर्व, मुख्य आणि शारीरिक चाचणी परीक्षांसह मुलाखती घेण्यात आल्या आहेत. परंतु अंतिम निकाल जाहीर झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एमपीएससी आयोगातर्फे ३ फेब्रुवारी २०१८ रोजी अराजपत्रित अधिकारी- गट ब, राज्य करनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार १३ मे २०१८ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मुख्य परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. यात पहिला टप्पा २ आॅगस्ट रोजी आणि दुसरा टप्पा २ सप्टेंबर २०१८ रोजी पार पडला. यानंतर आॅक्टोबर २०१९ मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी परीक्षा चार महिने चालली. जानेवारी २०२० मध्ये चाचणी परीक्षा संपल्यानंतर महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तरीही अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. पूर्व, मुख्य परीक्षेतील चाळणी होऊन शारीरिक चाचणी परीक्षा १५०० युवकांनी दिली आहे.
हे युवक दोन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करीत असल्यामुळे त्यांना इतर परीक्षांकडे लक्षही देता आले नाही. या जाहिरातीनुसार ३८७ जणांची निवड होणार आहे. त्यामुळे उर्वरित ११०० पेक्षा अधिक युवकांना अंतिम निकालात स्थान मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना इतरही परीक्षेची तयारी करता येत नसल्यामुळे अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे.
याशिवाय फेब्रुवारी २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदाची जाहिरात देण्यात आली होती. यात पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या मुख्य परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. त्यामुळे यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ शारीरिक चाचणी घेऊन अंतिम निकाल त्वरीत जाहीर करण्याची मागणीही परीक्षार्थींनी केली आहे.
महापोर्टल बंद केले पुढे काय?
भाजप सरकारच्या काळात विविध विभागांमधील पदभरतीसाठी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या पोर्टलविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता. सरकार बदलताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मागणीनुसार महापोर्टलला मूठमाती दिली आहे. ही यंत्रणा बंद करतानाच पर्यायी यंत्रणा काय? असा सवाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये चर्चिला जात आहे.